छत्रपती संभाजीनगर : कोकण जन्मभूमी असणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे (Anant Kanhere) शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध आला. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरूध्द त्यांचे तरुण रक्त सळसळले आणि नाशिकला त्यांनी कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन यांना जवळून गोळ्या झाडून वध केला. वयाच्या अठराव्या वर्षी फासावर चढणारे ते क्रांतिकारक ठरले.
हुतात्मा कान्हेरे यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर कान्हेरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा कान्हेरे यांनी केलेल्या त्यागाची आठवण देतो.
प्राथमिक शिक्षण इंदूर येथे झाल्यानंतर पुढे इंग्रजी शिक्षणासाठी १९०३ मध्ये अनंत कान्हेरे संभाजीगरात आले. आपले मामा गोविंद बर्वे यांच्याकडे ते रहात असत. मध्यंतरी एक वर्ष बार्शी येथे राहिल्यानंतर ते पुन्हा संभाजीगरात आले. संभाजीनगरात ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत.गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी गेले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले.
सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेशी कान्हेरे यांचा संबंध आला. या गटातील युवक संभाजीनगरात नियमित भेटत. तेव्हा नाशिक इलाख्यात जॅक्सनचे जुलमी अत्याचार सुरु होते. जॅक्सनने मराठी भाषेचा अभ्यास केला. तो सामान्य लोकांशी मराठीतच बोलत असे. परंतु बाबाराव सावरकर व अन्य क्रांतिकारकांच्या विरोधात त्याने राजद्रोहाचा खटला भरून काळ्या पाण्याची शिक्षा दिली. त्याचा राग तरुणांमध्ये धुमसत होता. त्यातच एका टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊन मारणा-या विल्यम या आधिका-यास जॅक्सनने सोडून दिले. क्रांतिकारी संघटनेत सहभाग घेत आसल्याच्या आरोपावरून बाबासाहेब खरे यांची वकिलीची सनद त्याने रद्द केली. तांबे शास्त्रींना कारागृहात पाठविले. त्यामुळे संभाजीनगरात जॅक्सन वधाची योजना आखली गेली.
जॅक्सनचा बदला घेण्याची वेळ आल्यानंतर गंगाराम यांच्या निवासस्थानी बैठक सुरु होती. तेव्हा कोवळ्या वयाचा अनंत कान्हेरे हे काम करु शकेल का? असे कोणीतरी विचारल्यावर समोर असणारा कंदील त्यांनी हातात घेतला.
जॅक्सनची मुंबईला प्रमोशनवर बदली झाल्यानंतर त्याला नाशिक येथे २१ डिसेंबर १९०९ निरोपाचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात 'रंगशारदा' नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. जॅक्सनच्या वधासाठी विनायक देशपांडे, अण्णा कर्वे, अनंत कान्हेरे यांची निवड झाली होती. जॅक्सन आल्यानंतर नाटकाची नांदी सुरु झाली. तोच अनंत कान्हेरे उठला व जॅक्सनवर धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यानंतर दुसरी पिस्तूल काढून स्वतः वर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्यानंतर कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.
क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाठविलेले पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आले. नेम अचूक रहावा म्हणून कान्हेरे यांनी संभाजीनगरात नेमबाजीचा सराव केला. आदल्या दिवशी नाशिकला पोहचल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जॅक्सनचा चेहराही पाहून घेतला होता. तसेच जॅक्सनला मारल्यानंतर आपल्याला फाशी होईल, म्हणून फोटो काढून आई वडिलांना पाठविला.
संभाजीनगरात सिटी चौकात कान्हेरे यांचा पुतळा आहे. त्यासाठी १९९० च्या सुमारास हुतात्मा अनंत कान्हेरे स्मृती समिती स्थापन झाली होती. या समितीचे तेव्हा अध्यक्ष असलेले ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी म्हणाले की, कान्हेरे हे सिटी चौक परिसरात रहात असत. त्यामुळे त्यांचा पुतळा या चौकातच उभारावा असा समितीचा आग्रह होता. महापालिकेने पुतळा उभारला असून समितीने निधी दिला होता. तत्कालिन खासदार मोरेश्वर सावे आणि आमदार चंद्रकांत खैरे यांचेही समितीला सहकार्य मिळाले. पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कान्हेरे यांचे नातेवाईक आवर्जून आले होते. समितीच्या वतीने संभाजीनगर, जालना आणि परभणीत सावरकर विचार संमेलनेही झाली. या पुतळ्याची जागा मध्यभागी असल्यामुळे व अतिक्रमणामुळे त्याकडे फारसे लक्ष जात नाही. तेव्हा हा पुतळा चौकातच बाजूला घेऊन सुशोभीकरण करावे आशी सूचना त्यांनी केली.
या पुतळ्याची अवस्था दयनीय झाली आहे. फलक, पोस्टर्स लावले जातात. परिसर अतिक्रमित झाला आहे. पुतळ्याखाली पादत्राणे दुरूस्ती असणारे दुकान आहे. याशिवाय हातगाड्या, टप-यांमुळे पुतळा लक्षात येत नाही. मध्यंतरी पोलिस बंदोबस्त असताना पुतळ्यावर मचान उभारली गेली होती हे विशेष.
खुदीराम बोसनंतर हौतात्म्य पत्करलेल्या अनंत कान्हेरे यांना संभाजीनगरकर विसरणार नाहीत ही अपेक्षा.