आनंद दिघे यांना मारण्यात आले होते, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला. File Photo
छत्रपती संभाजीनगर

आनंद दिघे यांची हत्या झाली होती; आ. संजय शिरसाट यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांची हत्या झाली होती. याविषयी ठाण्यातील सर्वजणांना माहिती आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. राज्य सरकारने दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिघे यांच्यावरील 'धर्मवीर- २' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूविषयी दावे- प्रतिदावे सुरू झाल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आरोप करणाऱ्यांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, आम्ही न्यायालयात जाऊ, असे स्पष्ट करत शिंदे गटावरच निशाणा साधला आहे. 'धर्मवीर-२ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता आनंद दिघेची हत्या झाली की खरोखर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आमदार संजय शिरसाट यांनी दिघे यांची हत्या झाली असल्याचे म्हटले आहे.

शिरसाट म्हणाले, दिघे यांचा अपघात झाला होताः त्यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी अचानक हार्टअॅटॅक त्यांना कसा आला? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्याचे उत्तर अजूनही शिवसैनिकांना मिळालेले नाही. याबाबत अनेक तर्क आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे? हे कार्यकत्यांना, समाजाला कळले पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.

ठाण्यावर आनंद दिघेची चांगली पकड होती. त्यांच्या शब्दापुढे कोणी नव्हते, त्यांचे हेच वर्चस्व काहींना खटकत होते. दिघेंची वाढणारी ताकद काहींच्या पचनी पडत नव्हती. त्यामुळेच त्यांचा बात झाला असावा, असे मतही शिरसाट यांनी व्यक्त केले.

आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत

केदार दिघे शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. 'धर्मवीर-१'मध्ये आनंद दिघे शेवटच्या स्टेजला जातात तेव्हा एकनाथ शिंदे दिघे यांना खांद्यावरून घेऊन जातात; मग याचा अर्थ काय होतो ? संजय शिरसाटांचा रोख एकनाथ शिंदेंवर तर नाही ना? असा थेट सवालच केदार दिघे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आनंद दिघेचा घातपात झाला, असे म्हणणारे शिरसाट २३ वर्षे काय करत होते? तुम्ही पुरावे द्या, दिर्धेचा पुतण्या म्हणून न्यायालयात जाण्यास तयार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT