वैजापूर : पुढारी वृत्तसेवा
पोलिस पाटलांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल करून समाजात बदनामी झाल्याचा आरोप करत एका व्यक्तीने पोलिस ठाण्याच्या आवारातच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन प्रयत्न केला. हा प्रकार (गुरुवार) (दि. ३) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान शिऊर पोलीस ठाण्यासमोर झाला. चेतन आत्माराम ढोकणे (रा. पाराळा) असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गट क्रमांक १३५ पाराळा शिवारात दोन एकर दहा गुंठे जमीन मालकीची असताना शेतातील मक्याची शेती मी पेटवून दिल्याची वडजी गावचे पोलीस पाटील मधुकर आप्पा निपटे यांनी माझ्यावर खोटी एन सी नोंदवली. त्या आधारित काही पत्रकारांनी बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे माझी बदनामी झाली. म्हणून पोलीस पाटील यांच्या विरोधात कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी चेतन ढोकणे यांनी शिऊर पोलिस ठाण्यात केली. तसेच पोलिस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये घेतल्याचा आरोपही या व्यक्तीकडून करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत ठाण्यात घडलेला प्रकार स्टंटबाजीचा होता. केलेले आरोप खोटे आहेत.
वैभव रणखांब
स.पो.नी पोलीस स्टेशन शिऊर