Adarsh ​​Scam : ३ वर्षांहून अधिक काळाच्या कोठडीनंतर सुटकेचा मार्ग मोकळा  file photo
छत्रपती संभाजीनगर

Adarsh ​​Scam : ३ वर्षांहून अधिक काळाच्या कोठडीनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

२०२ कोटींच्या आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापेला उच्च न्यायालयाकडून जामीन

पुढारी वृत्तसेवा

Ambadas Mankape, the main accused in the Rs 202 crore Adarsh ​​scam, gets bail from the High Court

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यभर गाजलेल्या तब्बल २०२ कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा आदर्श समूह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य प्रवर्तक अंबादास मानकापे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी अटी-शर्तीसह जामीन मंजूर केला. यापूर्वी दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मिळाल्याने तीन वर्षांहून अधिक काळानंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात २० डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अंबादास मानकापे याच्यासह वनिता मानकापे, अनिल मानकापे, सुनील मानकापे तसेच तत्कालीन संचालक मंडळातील सदस्यांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानुसार, बँकेचे अध्यक्ष असताना बनावट कर्जदारांच्या नावे कर्जे मंजूर करून ती रक्कम स्वतःच्या संस्थांकडे वळविणे, अनियमित कर्जवाटप करणे आदी आरोप मानकापे यांच्यावर आहेत. या फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.

सुनावणीवेळी बचाव पक्षाने आरोपी तीन वर्षांहून अधिक काळापासून न्यायालयीन कोठडीत असून, दोषारोपपत्र दाखल झाले असल्याने तपास पूर्ण झाला आहे, तसेच चौकशीसाठी त्याच्या कोठडीची आवश्यकता उरलेली नाही, असा युक्तिवाद केला. मानकापे कुटुंबाची मालमत्ता तपास यंत्रणेने जप्त केली असून पुराव्यांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

याशिवाय, १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार असलेल्या सहकारी संस्थांसाठी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापनेबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करत संबंधित ठराव पाठविण्यात आला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची एकही बैठक झालेली नसल्याची बाबही न्यायालयासमोर मांडण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंबादास मानकापे याचा अटी-शर्तीसह नियमित जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात त्यांच्या वतीने अॅड. संभाजी टोपे आणि अॅड. सार्थक माने यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT