छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | समृद्धी महामार्गावरील आंदोलनप्रकरणी अंबादास दानवे यांच्यासह, शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

वैजापूर पोलिसांची कारवाई; ४६ जण नामनिर्देशित, ३० ते ४० आंदोलकांवरही गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

नितीन थोरात

वैजापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समृद्धी महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी आमदार अंबादास दानवे यांच्यासह ४६ जणांवर तसेच ३० ते ४० अज्ञात शिवसैनिक व शेतकऱ्यांविरोधात वैजापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सोमवारी सकाळी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी

तालुक्यातील जांबरगाव इंटरचेंज जवळ समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली तसेच टायर जाळून निषेध व्यक्त केला. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलिस प्रशासनाने आंदोलनासाठी परवानगी नाकारली असतानाही आंदोलन करण्यात आल्याने घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

या प्रकरणी सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर समृद्धी महामार्गावर परवानगी नसताना अशा पद्धतीने आंदोलन केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT