Ambadas Danve : A mere shower of announcements from the municipal ruling party
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या शंभर दिवसांच्या कारभारावर शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांनी गुरुवारी (दि. २१) जोरदार टीका केली. यात शहरात प्रत्यक्ष विकासकामांपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून केवळ घोषणांचा पाऊस अधिक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवरून मनपा प्रशासनाला धारेवर धरले.
महापौर समीर राजुरकर यांनी बुधवारी (दि.२०) शहरातील विकास कामांसंदर्भात पुढील शंभर दिवसांचा आराखडा जाहीर केला. यावर आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले, शहरातील पाणीप्रश्न अद्याप गंभीरच असून, पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही.
तसेच अनेक भागांमध्ये नागरिकांना महिन्यातून अवघ्या काही वेळाच पाणी मिळत असल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली. यासह पडेगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, धूर व प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. तर मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे संथ गतीने सुरू असल्याने आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, मनपा आर्थिक अडचणीत असताना पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान ई-कार खरेदी करण्याचा निर्णय म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याची टीका दानवे यांनी केली. तर सिटी ट्रान्सफॉर्मेशन आणि २०४७व्हिजनसारख्या घोषणांनी शहराचे प्रश्न सुटणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.