फर्दापूर : अजिंठा घाटात मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अशी वाहतूक कोंडी होऊन शेकडो वाहने यात अडकली होती.  (छाया सागर भुजबळ)
छत्रपती संभाजीनगर

Ajintha Ghat traffic jam : अजिंठा घाटात पुन्हा ६ तासांची कोंडी

प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह: वऱ्हाड अडकले; रुग्णवाहिका, पर्यटकही खोळंबले

पुढारी वृत्तसेवा

फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात मंगळवारी (दि.२१) सकाळी दोन अवजड वाहनांमध्ये अचानक बिघाड झाल्याने तब्बल सहा तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाटातील अरुंद व वळणदार रस्त्यावर ही वाहने बंद पडल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. या कोंडीत अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, तसेच लग्नसराईमुळे प्रवास करणारी अनेक वन्हाडाची वाहने अडकून पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारा ट्रेलर (एमएच १२ झेडई १८८४) अजिंठा घाटातील धोकादायक ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वळ-णावर अचानक बंद पडल्याने एक मार्ग पूर्णपणे बंद झाला. त्याचवेळी फर्दापूरकडून सिल्लोडकडे विटा घेऊन जाणारा टेम्पो (एमएच ४३ यू ६५१४) काही अंतरावर बिघाड होऊन उभा राहिला. परिणामी घाटातील दोन्ही बाजूंनी वाहने अडकून वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली.

सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने घाटात शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने वहऱ्हाडाची अनेक वाहने या कोंडीत अडकली. काही ठिकाणी वधू-वर मंडळी वेळेवर पोहोचू शकली नाहीत, तर रुग्णवाहिका देखील तासन्तास अडकून पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. वार्षिक परीक्षा सुरू असतांना ही शालेय विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचता आले नाही, तर पर्यटकांना अजिंठा लेणीचा प्रवास अर्धवट सोडण्याची वेळ आली.

दरम्यान, फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकेरी मागनि टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनचालकांनी नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने कोंडीत अधिक भर पडली. अखेर दुपारनंतर वाहनांची संख्या कमी झाल्यावर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.

नेहमीचीच समस्या अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी ही नवी बाब नसून, अशा घटना वारंवार घडत आहेत. अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे घाटातील प्रवास धोकादायक बनला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण, ब्लाइंड स्पॉट्सवर सुरक्षा उपाय, तसेच तातडीची यंत्रणा उभारण्याची मागणी वारंवार होत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

पर्यटन, स्थानिक व्यापारावर परिणाम

जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांना अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने पर्यटनावरही परिणाम होत आहे. अनेक पर्यटक कोंडीमुळे परत फिरत असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हॉटेल, दुकाने व मार्गावरील लहान व्यवसायांवर याचा थेट परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT