पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने इलैयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता.
AIFF 2026 Ilaiyaraaja Padmapani Award
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणारा 'अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (AIFF) यंदा २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. या ११ व्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे, भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठित 'पद्मपाणि पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष तथा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने इलैयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलैयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे. चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना ही इलैयाराजा यांची प्रमुख ओळख आहे. कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे. प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, कला संचालक डॉ. शिव कदम, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.