सागर भुजबळ
फर्दापूर : सह्याद्रीच्या उपरांगेतील अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या दुर्मिळ 'सोनकाडी' रानफुलांचे अस्तित्व मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहे. सोयगाव तालुक्यातील टिटवी कालिंकामाता गड परिसरातील राखीव वनक्षेत्र आणि लगतच्या पठारावर प्लास्टिक कचरा, थर्माकोलच्या पत्रावळी तसेच दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडत आहे. पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे निसर्गसौंदर्याबरोबरच जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.
टिटवी कालिंका माता गड परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे वर्षभर हौशी पर्यटकांची वर्दळ असते. नवरात्रोत्सवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, काही पर्यटकांकडून वनक्षेत्रात तसेच लगतच्या पठारावर मद्यपानाच्या मैफली रंगवल्या जातात. यामुळे निर्माण होणारा कचरा वन्यजीवांसाठी घातक ठरत असून, परिसरातील दुर्मिळ रानफुलांचीही हानी होत आहे.
सोनकाडीचा सुवर्णमय बहर धोक्यात
अजिंठा डोंगररांगेतील टिटवी गड, वडाळा, कळसाई आणि गिल्डा पठारावर ऑक्टोबर महिन्यात सोनकाडीची पिवळीधमक रानफुले बहरतात. फुलांनी बहरलेले पठार जणू डोंगरमाथ्याने सुवर्णमुकुट धारण केल्याचा भास निर्माण करते. मात्र, पर्यटकांची वाढती वर्दळ आणि फुले पायदळी तुडवली जाण्यामुळे या वनस्पतींच्या फलधारणेवर परिणाम होत आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने आढळणारी सोनकाडी आता अत्यल्प प्रमाणात उरल्याचे वन्यजीव व वनस्पती संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.
चार गोणी कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश
सिल्लोड येथील वन्यजीव व वनस्पती संवर्धक डॉ. संतोष पाटील हे सहकारी मित्रांसह देवीच्या दर्शनासाठी गेले असता, राखीव वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा आणि दारूच्या फुटलेल्या बाटल्या आढळल्या. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी भाऊसाहेब निकोद, भिकन सोन्ने आणि देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या मदतीने चार गोणी प्लास्टिक कचरा गोळा केला. हा कचरा सिल्लोड येथे आणून नगरपरिषदेच्या कचरा गाडीत टाकण्यात आला. देवस्थान समिती, वनविभाग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांच्या सहभागातून लवकरच परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
देवस्थान समितीकडून पर्यटकांना वारंवार स्वच्छतेबाबत सूचना दिल्या जातात; मात्र काहींच्या बेजबाबदार वृत्तीमुळे परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वनक्षेत्रातील फुटलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे वन्यजीव जखमी होण्याची तसेच त्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरातील अनियंत्रित मानवी हस्तक्षेप रोखावा अशी अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जैवविविधतेचा अनमोल ठेवा
सोनकाडी ही सूर्यफूल कुळातील वर्षायू वनस्पती असून, तिची फुले मधमाशा आणि फुलपाखरांसाठी उपयुक्त ठरतात. 'पिया ब्ल्यू अर्थात नील वाटाणा या फुलपाखरालाही या फुलांतील मकरंद आकर्षित करतो. या वनस्पतीत आढळणाऱ्या काही घटकांचा संततीप्रतिबंधक गुणधर्मांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदात तिला 'वंध्यवारी' असेही संबोधले जाते, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.