House Pudhari
छत्रपती संभाजीनगर

पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या कर्जासाठी विकासकांनी पुढाकार घ्यावा

महापालिका आयुक्तांचे आदेश : कॉल सेंटर उभारण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ऑनलाईन लॉटरीत निवड झालेल्या लाभार्थ्यांना गृहनिर्माण कर्ज मिळवून देण्यासाठी संबंधित विकासकांनी बँकांशी समन्वय साधत सक्रिय भूमिका बजावावी, असे निर्देश बुधवारी (दि. २२) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

लाभार्थ्यांनी एकूण घरकुल किमतीपैकी १० टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक असून, उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे उभारता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता विजय गोरे यांच्यासह संबंधित विकासक उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी विकासकांना लाभार्थ्यांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी कॉल सेंटर उभारण्याचे, तसेच व्हॉट्सॲप गट तयार करून सातत्याने संवाद साधण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांशी समन्वय साधण्याची जबाबदारीही विकासकांनी पार पाडावी, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विकासकांनी बँक अधिकारी व लाभार्थी यांच्यात समन्वय साधून आवश्यक मदत करावी. त्यामुळे प्रक्रियेचा पाठपुरावा सुलभ होणार आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे ऑनलाईन लॉटरीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित विकासकांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यासह या योजनेअंतर्गत घर स्वीकारलेल्या लाभार्थ्यांनी पुढील ३० दिवसांत एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम जमा करावी, असे आवाहनही करण्यात आले.

नव्या अर्जांची प्रक्रिया २७ एप्रिलपासून

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नव्या अर्जांची प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू होणार असून, १८ मेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ११ हजार १२८ घरांचे बांधकाम प्रस्तावित असून, त्यापैकी ३६३८ घरांसाठी लाभार्थ्यांनी स्वीकृती दर्शवली आहे. उर्वरित ७४९२ घरांसाठी अद्याप इच्छुक लाभार्थ्यांची प्रतीक्षा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT