छत्रपती संभाजीनगर : ब्रिटिश लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ हा 28 एप्रिल 1819 मध्ये अजिंठा परिसरात वाघाच्या शिकारीसाठी आला असताना त्याला एका टेकडीच्या उतारावर दगडात कोरलेली गुहा दिसली. त्याने गुहेत प्रवेश केला व आतमध्ये गेल्यावर अपूर्व भित्तीचित्रांनी असलेल्या चैत्यगृहाचे दर्शन झाले. परिणामी काळाच्या उदरात दडलेल्या अजिंठा लेण्यांचा शोध लागला.
या शोधाची माहिती त्याने उघडकीस आणल्यानंतर अजिंठा लेण्यांमध्ये युरोपीयन अधिकारी, पुरातत्त्वज्ञ, इतिहासकार, कलाकार येऊ लागले.काहींनी चित्रे काढली, काहींनी त्या कलेचा अभ्यास केला, तर काहींनी त्याचा अभ्यास पाश्चिमात्य जगाला सादर केला.त्यामुळे अजिंठा लेणींची माहिती जगभर पसरली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार्या अजिंठा, वेरूळ लेण्या म्हणजे चित्रकलेचा समृद्ध वारसाच होय असे म्हटले पाहिजे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या दोन्ही लेण्यांचा समावेश केला आहे.
अजिंठा हे सोयगाव तालुक्यात असून, संभाजीनगर आणि जळगावच्या सीमेवर आहे. लेण्यांचे काम इ.स.पूर्व दोन ते पाच शतकादरम्यानचे आहे. सर्व चित्रे लेण्यांच्या भिंतीवर व छतावर चितारलेली आहेत. प्रामुख्याने बौद्ध विचारांचा प्रभाव दर्शविणार्या लेण्या असून, जलरंगात रंगविलेली चित्रे दीर्घकाल टीकावीत यासाठी डिंकाचा वापर करण्यात आला आहे. फे्रस्को पद्धतीची चित्रकला असून चित्रे दीर्घ कालावधीनंतरही टीकून आहेत, हे विशेष.
या चित्रातील मुख्य पात्राचे महत्व वाढवण्यासाठी यक्ष, गंधर्व ,अप्सरा ,किन्नर ,राक्षस ,गरुड व पशुपक्षी यांची चित्रे रेखाटलेली आहेत. याशिवाय गौतम बुद्धाच्या जीवना संबंधीच्या वर्णनात्मक जातक कथांच्या आधारे काही चित्रे आहेत. यात सीबी जातक, शरभ जातक, ब्राम्हण जातक वगैरे अनेक जातक कथा दाखविण्यात आल्या आहेत. तिसर्या विभागात गौतम बुद्ध, बोधिसत्व ,राजा राणी इत्यादी चित्रां शिवाय गौतम बुद्धाची अभय मुद्रा, धम्मचक्र मुद्रा ,भूमीस्पर्श मुद्रा, वरद मुद्रा इत्यादी अवस्थेतील चित्रे आहेत. ही सर्व चित्रे चित्रकलेच्या दृष्टीने असामान्य ,अप्रतिम आणि अद्वितीय आहेत.
अजिंठा येथे एकूण 29 लेण्या आहेत. चैत्यगृहे, विहारात असणारे लेणीकाम लक्ष वेधून घेते. सुंदर सजावट, छतावरील रंगकाम, उत्तम भित्तीचित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये म्हटली पाहिजेत.
छत्रपती संभाजीनगरपासून 30 किमी अंतरावर असलेल्या वेरूळ लेण्यांवर हिंदू, बौद्ध, जैन विचारांचा प्रभाव आहे. सहाव्या व दहाव्या शतकात लेण्या कोरल्या असाव्यात, असे अभ्यासकांना वाटते. एकूण 34 लेण्या असून, 12 बौद्ध, 17 हिंदू आणि पाच जैन लेणी आहेत. या लेणीत लोकप्रिय असणारे कैलास लेणे अखंड पाषाणात कोरलेले आहे. कैलासावर शिव-पार्वती असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवित आहे, असे शिल्प आहे. सुंदर शिल्पकला, मूर्ती, स्तंभ, आणि चित्रकाम वेरूळात आढळते.प्रत्येक लेणीमध्ये धार्मिक कथा, देव-देवता, आणि पौराणिक घटनाचे चित्रण असून लेण्यांपासून काही मिनिटांच्या अंतरावर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक घृष्णेश्वराचे मंदिर आहे.