Airport runway expansion; farmers oppose land acquisition
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी १३९ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अद्याप मोबदलाच निश्चित झालेला नसून शेतकरी अक्रमक झाले आहेत.
सध्याच्या बाजारभावाच्या चार पट मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ५) जागा देण्यास नकार दर्शविला आहे. दुसरीकडे, संबंधित भागातील रेडीरेकनर दर तुलनेने कमी असल्याने प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
या प्रक्रियेत ७०० हून अधिक मालमत्ताधारक बाधित होणार आहेत. या भूसंपादनासाठी तब्बल ७३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत २५२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. काही मालमत्ताधारकांना जुन्या रेडीरेकनर दरानुसार २५ टक्के मोबदला देण्यात आला आहे.
परंतु, वाढीव दराने मोबदला मिळावा, अशी मागणी काहींनी केली. त्यावरुन वाद निर्माण झाला असून मोबदला निश्चितीसाठी प्रस्ताव नगर रचना विभागाला सादर केला होता. परंतु, त्यांनी नकार दिल्याने आता नवा पेच निर्माण झाला येथील मालमत्ताधारक सध्याच्या बाजारभावाच्या चारपट जास्तदराने मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे भूसंपादन रखडणार असल्याची चर्चा आहे.