Chikalthana Airport : प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडले विमानतळाचे भूसंपादन  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chikalthana Airport : प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडले विमानतळाचे भूसंपादन

प्रारंभिक अधिसूचना जारी होऊन आठ महिने उलटले, पुढील कार्यवाही होईना

पुढारी वृत्तसेवा

Airport land acquisition stalled due to administrative delays

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीचा (रन-वे) विस्तार करण्यासाठी आणखी १४७एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जारी केली. मात्र आठ महिने उलटूनही पुढील कार्यवाही झालेली नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे ही प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे.

सध्या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट आहे. मोठ्या क्षमतेची विमान उतरण्यासाठी ही लांबी १२ हजार फूट करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आणखी १४७ एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी चिकलठाणा, मुर्तजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्याचा निर्णय शासनाने याआधीच घेतलेला आहे.

मार्च २०२३ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ६८ कोटींचा निधीही प्राप्त झाला. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी ८ जानेवारी रोजी कलम ११ (१) नुसार ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनंतर तीनशेहून जास्त आक्षेप दाखल झाले. या आक्षेपांवर सुनावणीही घेण्यात आली. विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीमध्ये जवळपास ७०० मालमत्ता बाधित होणार आहेत. या मालमत्तांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्यात आले.

मात्र आता आठ महिने उलटूनही पुढील कार्यवाही झालेली नाही. डिसेंबरअखेरपर्यंत ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. परंतु अद्याप अंतिम अधिसूचना जारी न झाल्याने ही डेडलाईन हुकण्याची चिन्हे आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळेच हे भूसंपादन रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबदल्याबाबत संभ्रम

शासनाने विमानतळाच्या भूसंपादनासाठी छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी यांना विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी जानेवारी महिन्यात प्रारंभिक अधिसूचना जारी केली. मात्र शेतकऱ्यांना नेमका किती मोबदला मिळेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून त्याबाबत शेतकऱ्यांना अजूनही नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. कधी दोन पट तर कधी चार पट मोबदला देण्याबाबत अधिकाऱ्यांकडून तोंडी सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत २५२ कोटींचा निधी प्राप्त

विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी सुमारे ७३४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत त्यापैकी २५२ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी तीन टप्प्यांत मिळाला आहे. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या विस्तारीकरणासाठी चिकलठाणा, मुर्तजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येणार आहे. यात चिकलठाण्यातील एकूण ४४ गट, मुर्तुजापूर मधील ४ तर मुकुंदवाडीतील ८ गटांचा समोवश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT