Agency Supplying Manpower to Municipal Corporation Prepares for Work Stoppage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या महाराणा एजन्सीचे काम थांबविल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया केली. त्यात एकाचीच मक्तेदारी नको म्हणून चार एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेत प्रत्येकांना ५०० कर्मचारी पुरवठा करण्याचे काम दिले. परंतु कार्यारंभ आदेशाला दीड महिनाही पूर्ण होत नाही तोच या चारपैकी एका एजन्सीने काम बंद करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. तसेच उर्वरित एजन्सी पळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
महापालिकेचे मागील दोन दशकांत शेकडो कायमस्वरूपी अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु त्यांच्या जागी नव्याने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी महापालिकेने कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरती करण्यावर भर दिला. त्यासाठी महाराणा या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजन्सीची नियुक्ती केली होती.
या एजन्सीसोबतच अशोका आणि गॅलेक्सी एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. यात सर्वाधिक २ हजार कर्मचारी महाराणा एजन्सीद्वारे पुरविले जात होते. मात्र किमान वेतन आणि दरमहा वेतन मिळत नसल्याच्या तक्रारीवरून महाराणा एजन्सीविरोधात तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी काम बंदची कारवाई केली.
या एजन्सीच्या जागी महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून ४ एजन्सी नियुक्त केल्या आहेत. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे, त्यांच्या वेतनातून कंत्राटदाराने कपात करू नये, कंत्राटदाराला एकूण देयकावर फिक्स ३.८४ टक्के कमिशन देण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले होते. परंतु या कमिशनमधून जीएसटीपोटी २ टक्के कपात होणार आहे. त्यामुळे कमिशन केवळ पावणेदोन टक्केच हातात पडणार असल्याने व इतर छुप्या अटी असल्याने मुंबईच्या एका एजन्सीने काम बंदचे पत्र महापालिकेला दिले आहे.
नियुक्त केलेल्या नव्या एजन्सी
महापालिकेने कंत्राटीतत्त्वार मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ओमसाई मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रा.लि. (२९७), सीआयएसबी प्रा.लि. (वर्ग केलेले कर्मचारी ४१३), सिंघ इंटेलिजन्स सेक्युरिटीज प्रा. लि. (६११), मेडिएटर्स अॅण्ड अजिंठा सेक्युरिटीज प्रा.लि. (५०८) यांची नियुक्ती केली.