खासदार सुनील तटकरे  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महापालिका निवडणुकीनंतर युतीतील घटक पक्ष पुन्हा एकत्रच !

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण : आज विरोधात, उद्या एकत्रित चर्चा

पुढारी वृत्तसेवा

After the municipal elections, the constituent parties of the alliance will come together again!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महायुतीतील तिन्ही पक्ष सध्या महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र बसून चर्चा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या काळात टीका-टिप्पणी होत असते, मात्र त्यातून कटुता वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर गुरुवारी (दि.८) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तटकरे म्हणाले, राज्यात आम्ही महायुतीमध्ये सहभागी आहोत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील राजकीय व प्रशासकीय परिस्थिती प्रत्येक शहरात वेगळी असते. त्यामुळे संभाजीनगर महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज निवडणुकीच्या मैदानात वेगवेगळे लढत असलो तरी याचा अर्थ युती तुटली, असा होत नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र बसून सर्व बाबींवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याविषयी माहिती देताना तटकरे म्हणाले की, विकासाचा ठोस आणि वास्तववादी आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवला आहे. शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणीप्रश्र हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे. केवळ घोषणा करून मतदारांची फसवणूक करण्याऐवजी अंमलबजावणी योग्य उपाययोजना देण्यावर आमचा भर आहे.

विकासाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे वचनबद्ध असून, शहराच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही ठाम भूमिका घेत राहू, असे त्यांनी सांगितले. तर पर्यटन क्षमतेवर भाष्य करताना ते म्हणाले, या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मात्र पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आजही अपुऱ्या आहेत.

रस्ते, पार्किंग, स्वच्छता, माहिती केंद्रे यासारख्या सुविधा विकसित झाल्यास देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात. याचा थेट फायदा स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि शहराच्या अर्थव्यवस्थेला होईल, असा उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. दरम्यान शहरातील नागरी सुविधांकडे लक्ष वेधताना तटकरे यांनी सार्वजनिक शौचालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित केला.

स्मार्ट सिटीचा गवगवा केला जात असताना मूलभूत स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. यावरून सत्तेत सहभागी असतानाही राष्ट्रवादीने युतीच्या स्थानिक कारभारावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप अपरिहार्य असतात, मात्र त्यातून राजकीय संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत तटकरे म्हणाले, आज विरोधात असलो तरी उद्या एकत्र बसून संवाद साधणे हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना - भाजप युतीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

शहरातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर बोट ठेवत गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना सत्ताधाऱ्यांकडून ठोस तोडगा निघालेला नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे तटकरे यांनी सूचित करत छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात आजही पर्यटकांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे महापालिकेतील शिवसेना -भाजप युतीच्या काराभारावरच प्रश्न उपस्थित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT