Adulterated food stock worth ₹2.5 crore seized in nine days
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून राज्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू असून, याअंतर्गत 1 ते 9 जूनपर्यंतच्या अवघ्या नऊ दिवसांत 27 ठिकाणी धाडी टाकून तब्बल दोन कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांनी दिली.
खाद्य पदार्थांमध्येही भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अन्न प्रशासनाकडून तोकड्या मनुष्यबळाचे कारण देत केवळ सणासुदीच्या तोंडावरवरच नाममात्र कारवाई केली जाते. मात्र विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्याने सर्वच अधिकारी-कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत.
याचेच फलित म्हणजे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत किरकोळ विक्रेत्यांपासून ते घाऊक विक्रेते, उत्पादक, कंपन्यांवरही धाड सत्र सुरू आहे. 1 जूनपासून अन्न प्रशासनाच्या पथकाने तब्बल 27 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
या 11 ठिकाणी प्रतिबंधित व संशयित खाद्यतेल, तूप, आईस्क्रिम, एनर्जल यासह फळे आणि विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यासह राज्यात बंदी असलेले पानमसाला, गुटखा असा एकूण 2 कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा साठा जप्त केल्याचे सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील म्हणाले.
9 एफआयआर, 6 जणांना अटक
कारवाई दरम्यान अन्न प्रशासन पथकाने या नऊ दिवसांत 9 जणांवर गुन्हे दाखल केले. यात सहा जणांना अटकही झाली. याशिवाय प्रतिबंधित गुटख्याची छुपी वाहतूक करणारी 34 लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.