Administration fails in NEET re-examination
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने रविवारी (दि. २१) पुन्हा घेण्यात आलेली नीट परीक्षा अतिखबरदारीमुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक मनस्ताप देणारी ठरली. पोलिस आणि प्रशासनाकडून तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले. एनटीएने मुभा देऊनही काही केंद्रांवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल सोबत नेऊ दिल्या नाहीत. दुसरीकडे विद्यार्थ्यांसोबत केंद्रावर आलेल्या पालकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून असभ्य अशी वागणूक मिळाली. शिवाय परीक्षेआधी जिल्हा प्रशासनाने सुविधांचे केलेले दावेही फोल ठरल्याचे दिसून आले.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने नीट परीक्षा घेण्यात येते. याआधी ३ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने ही परीक्षा रद्द ठरवून ती २१ जून रोजी पुन्हा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात ४७ आणि ग्रामीण भागातील तीन अशा एकूण ५० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व केंद्रांवर एकूण १७ हजार ७३४ परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात १५,९५३ विद्यार्थी उपस्थित राहिले.
तर १३२७ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेकडे पाठ फिरविली. या फेरपरीक्षेवेळी आधीच्या तुलनेत खूप अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकांना शंभर मीटर दूरच ठेवण्यात आले होते. नीट परीक्षेआधी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधिक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा आणि उपाययोजनांची माहिती दिली होती. विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही तसेच खबरदारी म्हणून रुग्णवाहिका वगैरे तैनात असतील, असे त्यांनी सांगितले होते. परंतु हे सर्व दावे रविवारी फोल ठरले.
रुग्णवाहिकेचा पत्ता नाही : फिट येऊन पडलेल्या विद्यार्थ्याला वाऱ्यावर सोडले
नवखंडा येथील डॉ. रफिक झकेरिया कॉलेज वुमन्सच्या परीक्षा केंद्रांवर एका विद्यार्थ्याला आत प्रवेश करताना फिट आली. तो विद्यार्थी अचानक खाली पडला, सुमारे पंधरा मिनिटे तो हातपाय खोडत होता. इतर विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच काही जणांनी रुग्णवाहिका बोलावली, परंतु वीस मिनिटांनंतरही रुग्णवाहिका पोहोचली नाही.
केंद्रात जाण्याआधीच विद्यार्थ्यांची परीक्षा; पाण्याच्या बाटलीलाही मज्जाव
परीक्षेसाठी एनटीएने आधीच सूचना जारी केलेल्या होत्या. त्यानुसार साधे कपडे, पायात चप्पल आणि सोबत पारदर्शक पाणी बॉटल घेऊन विद्यार्थी केंद्रांवर पोहोचले. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याआधी दोन ते तीन ठिकाणी पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. अगदी कान, केस हेही तपासण्यात आले. तसेच सोबत पाणी बॉटल नेण्याची मुभा असूनही काही केंद्रावर विद्यार्थ्यांना ती नेऊ देण्यात आली नाही.
पोलिसांची अरेरावी पालकांना हुसकावून लावले
पालकांचीही गर्दी झाली होती. खबरदारी म्हणून पालकांना परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर दूरच ठेवण्यात आले होते, परंतु तिथेही सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पालकांसोबत उद्धटपणे वागण्यात येत होते. वेळोवेळी तेथूनही पालकांना हुसकावून लावण्यात आले. यावरून काही ठिकाणी पालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या.