Aditya Thackeray: Where did the bags of money and liquor shops come from?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महायुती सरकारच्या काळात शहराचा विकास ठप्प झाला आहे. महायुतीचे येथील नेते उद्या तुमच्याकडे मत मागायला येतील. तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्या बॅगांमध्ये दिसलेले पैसे कोठून आले, दारूची दुकाने मागील वेळी १२ ऐकली होती, आता २० झाली म्हणतात. ही कोठून आली, अशा शब्दांत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली.
महापालिका निवडणुकीत शिव-सेना उबाठा पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २६) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील मशाल रॅलीने झाला. क्रांती चौकातून गुलमंडीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गुलमंडी येथे जीपच्या टपावर उभे राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या सरकारच्या काळात पाणीप रवठा योजनेसह रस्ते, सायकल ट्रॅकचे काम हाती घेतले होते, ते पूर्ण झाले का, तुम्हाला पाणी मिळतेय का, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली त्यावर कार्यकर्त्यांकडून नकारात्मक उत्तर आल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, महायुतीच्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सर्व काही ठप्प झाले आहे. महायुती सरकारचे हे भूत परवडणारे नाही. त्यामुळे १५ जा नेवारी रोजी बदल करा, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री संजय शिरसाट आणि खासदार भुमरे यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली. महायुतीच्या येथील नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बॅगांमध्ये नोटांची बंडले दिसली. हे पैसे कोठून आले. येथील खासदारांचा व्यवसाय काय आहे, अशी विचारणा ठाकरे यांनी केली.
त्यावर समोरून दारूची दुकाने, असे उत्तर आले. किती दुकाने आहेत, असेही ठाकरे यांनी विचारले. समोरून २०, असे उत्तर आले. मागीलवेळी मी १२ दुकाने ऐकली होती, आता ८ दुकाने वाढली, ही कोठून आली, हेही त्यांना विचारा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
वसुलीबाजांचे सरकार
राज्यातील महायुती सरकारचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. तो म्हणजे लुटालुटीचा. मुंबई लुटण्याचे, महाराष्ट्र लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. हे सरकार विल्डरांचे, कॉन्ट्रॅक्टरचे, हे वसुलीबाजांचे सरकार आहे. पण जनतेचे सरकार नाही. हेच भाजपवाले, हीच मिंध्यांची टोळी उद्या तुमच्याकडे येईल, तेव्हा त्यांना जाब विचारा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
रशीद मामूंच्या प्रवेशाचे समर्थन
रशीम मामूंच्या प्रवेशावरून भाजपचे नेते सध्या शिवसेना उबाठा पक्षावर जोरदार टीका करत आहेत. त्याचा संदर्भ देऊन आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही कोणाला प्रवेश दिला, म्हणून जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना आधी विचारा, तुम्ही पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना भाजपात प्रवेश का दिला, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलतानाही आदित्य ठाकरे यांनी रशीद मामूंच्या मुद्द्द्यावरून खुलासा केला. रशीद मामू आमच्या पक्षाची भूमिका मान्य करून आमच्या पक्षात आलेत. त्यांच्या पक्षाचे नेते नवाज शरीफची बिर्याणी खातात, जिनांच्या कबरीवर जाऊन डोके टेकवतात, ते कसे चालते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.