Action on overloaded, overspeeding vehicles at Ajantha Ghat
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती -संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर ते अजिंठा घाट मार्गावर अवजड व ओव्हरलोड वाहने बंद पडल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.२९) वाहतूक शाखा, फर्दापूर पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. ओव्हरलोड, ओव्हरस्पीड, धोकादायक मालाची वाहतूक तसेच वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. फर्दापूर-अजिंठा घाट परिसरात वाहनांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
विशेषतः क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे घाटात वाहने बंद पडून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. या कारवाईत छत्रपती कार्यालयाच्या महिला संभाजीनगर प्रादेशिक परिवहन परिवहन अधिकारी पांडव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे पोउनि मुंडे, हेड कॉन्स्टेबल संपाळ तसेच फर्दापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार फिरोज तडवी सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंड आकारण्यात आला.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाय
अजिंठा घाट हा पर्यटन व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी अशा वाहनांची नियमित तपासणी करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस व आरटीओ विभागाची संयुक्त कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.