Acid attack on animals in Chhatrapati sambhajinagar
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (दि. २६) एका अज्ञात व्यक्तीने दोन मुक्या गुरांवर ॲसिड फेकल्याने ती गंभीररीत्या भाजली आहेत. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हृदय पिळवटून टाकणारी अवस्था
ॲसिड हल्ल्यामुळे या दोन्ही जनावरांची त्वचा अक्षरशः सोलून निघाली आहे, ज्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांची अवस्था अत्यंत वेदनादायी असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जखमांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत.
अमळनेर, लखमापूर, कायगाव आणि गणेशवाडी या परिसरात देवाला वाहिलेली अनेक गुरे (वनगुरे) फिरत असतात. मात्र, गावातील चराई क्षेत्र कमी झाल्याने ही जनावरे अनेकदा शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात. याच रागातून कोणीतरी हे निंदनीय कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेवर प्राणीमित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पिकांचे नुकसान झाले असेल, तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत. पण अशाप्रकारे मुक्या जिवावर ॲसिड हल्ला करणे ही विकृती आहे. या क्रूरतेला समाजात कोणतीही जागा नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या घटनेवर आमदार प्रशांत बंब यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. "ही घटना माणुसकीला लाजवणारी आहे. अशा गुन्हेगारांची जागा समाजात नाही, तर तुरुंगात आहे. मी अधिकाऱ्यांना तात्काळ आरोपीचा शोध घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत," असे ते म्हणाले.
गंगापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्राथमिक तपास सुरू केला आहे. लवकरच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेने केवळ प्राणीप्रेमींच्याच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता पोलीस तपासात आरोपी कधी सापडतो आणि या मुक्या जिवांना न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.