छत्रपती संभाजीनगर

‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

Arun Patil

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर खासगी प्रवासी बस आदळून बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी झाले. मृत आणि जखमी प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. वैजापूरजवळील जांबरगाव टोल नाक्यावर
शनिवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रकचा आरटीओकडून पाठलाग सुरू होता. त्यामुळे चालकाने ट्रकचा वेग कमी केला. त्याचवेळी मागून वेगाने येणारी बस त्यावर आदळली, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान निधीतून दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल, असे घोषित केले.

नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परत येत होते. या बसच्या पुढे महामार्गावर ट्रक जात होता. गस्तीवर असलेल्या आरटीओने ट्रकचा पाठलाग करत ट्रक अडविला. ट्रक बाजूला घेत असताना मागून येणारी बस ट्रकवर आदळली आणि अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत चार वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. पोलिस, आरटीओ आणि टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री दादा भुसे, संदिपान भुमरे यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT