Abuse of minor niece at Kannada
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजू गंगाराम गायकवाड (रा. सायगव्हाण) असे अटक केलेल्या आरोपी मामाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेच्या आईने दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे तिचे वडील दुसरीकडे राहतात. म्हणून पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ आपल्या आजी आजोबांसमवेत राहत होती. आजी काही दिवसांपासून दुसऱ्या लेकीकडे गेल्याने पीडिता व तिचा लहान भाऊ घरी राहत होते.
३१ जुलै रोजी रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास मामाने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. आरोपीने पीडितेला व तिच्या लहान भावाला ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु पीडितेने धाडस दाखवले आणि राजू गंगाराम गायकवाड याच्याविरुध्द ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद केला.
पोलिसांनी गुन्हा नोंद होताच तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव करीत आहेत.