Abducted 3-Year-Old Child Rescued
वाळूज, पुढारी वृत्तसेवा येथील अण्णाभाऊ साठेनगर येथून अपहरण झालेल्या तीन वर्षीय बालकाची अवघ्या काही तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
साठेनगर येथून ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आकाश पवन गायकवाड (वय ३) या चिमुकल्याचे अपहरण झाले होते. रविवारी (दि. ५) वडील पवन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सिडको बसस्थानकावर दोन लहान मुलांना कोणीतरी सोडून गेल्याची माहिती एका रिक्षाचालकान सिडको वाहतूक शाखेचे सहायक फौजदार जितेंद्र चव्हाण यांनी नियंत्रण कक्षाला कळविले. दामिनी पथकाच्या निर्मला अंभोरे, सरिता कुंडारे आणि राणी केदार यांनी तात्काळ धाव घेत मुलांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यातील एक मुलगा वाळूजचा आकाश असल्याचे निष्पन्न झाले. चॉकलेटचे आमिष दाखवून एका व्यक्तीने येथे सोडल्याचे मुलांनी सांगितले. दुसरीकडे, या घटनेमुळे वाळूज पोलिस ठाण्यात मध्यरात्री नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. नागरिकांनी संशयित शेजारील महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसी खाक्या दाखवताच तिने तिचा प्रियकर दिलीप जितमल जाधव (३०, रा. बिडकीन, ह.मु. साठेनगर) याने मुलाला नेल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पहाटे बिडकीन गाठून मुख्य आरोपी दिलीपच्या मुसक्या आवळल्या.
गुन्ह्याचे नेमके कारण शोधण्यासाठी पो.नि. शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. अजय शितोळे अधिक तपास करत आहेत. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिसरात काही काळ दहशतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.