A young man attacked two people with a knife
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मेरे अब्बू को किसने मारा असे म्हणत तरुणाने दोघांच्या गेल्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वार अडविल्याने एकाच्या हातावर तर दुसऱ्याच्या कपाळावर लावून गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास शहाबाजार, भोईवाडा भागात घडली. जोहेब शोएब पठाण (रा. शहाबाजार) असे आरोपीचे नाव आहेत.
फिर्यादी श्रीकांत रंगनाथ कोमटवार (३२, रा. स्वामी विवेकानंद नगर, टीव्ही सेंटर) हा महापालिकेत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. तो त्याचे मित्र अमरनाथ गंदलवाड, गौरव पूनमचंद सुंदरवाड, शुभम दुबकवाड, गणेश गोखले असे चिंचेच्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी जोहेब तिथे आला.
त्याने शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. कंबरेचा चाकू काढून गौरव आणि शुभमला दाखवून मेरे अब्बू को किसने मारा अशी विचारणा केली. त्याला सर्वानी आम्ही नाही मारले असे म्हणत असताना त्याने चाकू हवेत फिरवून शिवीगाळ केली. त्यानंतर मुस्कान किराणा दुकानाजवळ शिवीगाळ करत गेला. तेथे योगेश रताळे हा फोनवर बोलत उभा असताना त्याला तू निकल जा यहा से नही तो जान से मार दूंगा अशी धमकी देऊन योगेशच्या गळ्यावर चाकूने वार केला.
परंतु यो गेशने हात आडवा केल्याने त्याच्या हातावर चाकू लागून तो रक्तबंबाळ झाला. त्याला वाचविण्यासाठी फिर्यादी श्रीकांतसह मित्र धावले. तेव्हा जोहेबने हवेत चाकू फिरवून अभि तुझे जान से मार दूंगा असे म्हणत श्रीकांतच्या गळ्यावर वार केला. त्यानेही वार चुकविला मात्र चाकू त्याच्या कपाळावर लावून ओठापर्यंत वार झाला.
श्रीकांतही रक्तबंबाळ होऊन पडला. जोहेब तेथून पसार झाला. श्रीकांत आणि योगेशला जखमी अवस्थेत मित्रांनी सिटी चौक ठाण्यात आणून येथून घाटीत नेले. दरम्यान, योगेशचा भाऊ संतोष रताळे यांच्याकडून समजले की, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोहेबचे वडील शोएब पठाण यांना सतीश बाबुलाल वाडे याच्या दुचाकीचा धक्का लागल्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्या घटनेचा राग मनात धरून जोहेबने हा चाकूहल्ला केला.
याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन करत आहेत.