Garbage Depot : दहा मिनिटांतच उचलला जाणार ट्रॅक्टरभर कचरा file photo
छत्रपती संभाजीनगर

Garbage Depot : दहा मिनिटांतच उचलला जाणार ट्रॅक्टरभर कचरा

जटायू मशीनचे चिकलठाणा एमआयडीसीत प्रात्यक्षिक : एक टन कचरा उचलण्याचा कंपनीचा दावा

पुढारी वृत्तसेवा

A tractor-load of garbage will be cleared in just ten minutes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील बंद करण्यात आलेल्या कचरा डेपोंच्या जागा स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जात असतानाच काही नागरिकांकडून रात्री, पहाटे किंवा सकाळी पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. अशा ठिकाणी साचलेला कचरा पारंपरिक पद्धतीने उचलण्यासाठी मनुष्यबळ, वाहने आणि मोठा वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर अवघ्या आठ ते दहा मिनिटांत ट्रॅक्टरभर कचरा उचलणाऱ्या जटायू मशीनचे प्रात्यक्षिक चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घेण्यात आले. या मशीनद्वारे सुमारे एक टन कचरा उचलता येत असल्याचा दावा संबंधित कंपनीकडून करण्यात आला आहे.

शहरात दररोज निर्माण होणारा कचरा लवकरात लवकर उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून यांत्रिक पर्यायांचा विचार केला जात आहे. कमी मनुष्यबळात आणि कमी वेळेत अधिक कचरा उचलता यावा, यासाठी जटायू मशीनची कार्यक्षमता तपासण्यात आली. चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात या मशीनने अवघ्या आठ ते दहा मिनिटांत ट्रॅक्टरभर कचरा उचलल्याचे दाखविण्यात आले.

कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर या मशीनचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी नगरसेवक मनोज गांगवे राजगौरव वानखेडे आदींची उपस्थिती होती. हे जटायू मशीन कोणत्याही प्रकारच्या वाहनावर बसवता येत असल्याने कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे टाकला जाणारा कचरा कमी वेळेत हटविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, विभागीय आयुक्त तथा सीएसएमआरडीएचे जी. श्रीकांत यांनी महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कचरा संकलनासाठी अशा मशीनचा वापर करता येईल का, याची चाचपणी केली होती. यात पुणे जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये अशा मशीनचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कंपनीशी संपर्क साधून संभाजीनगरात प्रात्यक्षिकासाठी बोलावण्यात आले.

या प्रात्यक्षिकादरम्यान पाच ते दहा किलो वजनाच्या वस्तूही मशीन सहज उचलत असल्याचे दिसून आले. कमी वेळेत कचरा हटविण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, मात्र ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सुविधा मशीनमध्ये नसल्याने दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र उचलला जातो. ही या यंत्राची प्रमुख मर्यादा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT