A person supplying logistics to ISI arrested from Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थेट पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय' साठी भारतात फंडिंग नेटवर्क चालवणाऱ्या एका एजंटच्या राजस्थान सीआयडीने (इंटेलिजन्स) मुसक्या आवळल्या आहेत. रफिक चांद शेख (४१, रा. सईदा कॉलनी, हर्सल) असे या संशयिताचे नाव असून, ३० जून रोजी त्याला शहरातून ताब्यात घेण्यात आले. तो गेल्या चार वर्षांपासून हेरगिरी करणाऱ्या लोकांपर्यंत आर्थिक रसद पोहोचवण्याचे काम करत होता. या नेटवर्कशी जोडलेल्या अन्य काही संशयितांचीही कसून चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजस्थानचे एडीजी (इंटेलिजन्स) प्रफुल्ल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने जानेवारी महिन्यात जैसलमेर येथील रहिवासी झबरा राम आणि आसामच्या दिब्रुगड एअरफोर्स स्टेशनवर 'एमटीएस' पदावर कार्यरत असलेल्या सुमित कुमार या दोघांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती.
या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना हसूलमधील रफीक चांद शेख याचा सहभाग उघडकीस आला. त्याला नोटीस बजावून चौकशी केली असता, अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याने सीआयडीने त्याला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना हेरगिरीच्या मोबदल्यात 'आयएसआय' कडून रफीक चांद शेख यानेच पैसे पाठवले होते. सीआयडीने केलेल्या चौकशीत रफीकने आपला गुन्हा कबूल केला आहे. तो गेल्या ४ वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून 'आयएसआय'च्या एका हँडलरच्या संपर्कात होता. हँडलरच्या इशाऱ्यावर त्याने स्वतःच्या नावाव्यतिरिक्त इतर डमी लोकांच्या नावावरही वेगवेगळी बँक खाती उघडली होती. याच खात्यांचा वापर 'आयएसआय'कडून आलेला पैसा देशातील हेरांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात होता.
असे पोहोचले शहरापर्यंत धागेदोरे !
हेरगिरीच्या संशयावरून राजस्थान सीआयडीने यापूर्वी ई-मित्र केंद्र चालक झबराराम (२८, रा. नेडान, पोकरण, जि. जैसलमेर) याला अटक केली होती. याच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली की, झबरारामचे व्हॉट्सअॅप थेट पाकिस्तानातून 'आयएसआय'चे हँडलर्स चालवत होते.
पैशांच्या आमिषाला बळी पडून आरोपीने स्वतःच्या मोबाईलवर आलेला 'ओटीपी' पाकिस्तानी एजंटला दिला होता. या बदल्यात त्याला पाकिस्तानातून जी पैशांची रसद पुरवली जात होती, त्या 'मनी ट्रेल'चा सीआयडीने कसून तपास केला. याच पैशांचा माग काढत असताना या देशद्रोही कटाचे धागेदोरे थेट संभाजीनगरपर्यंत पोहोचले आणि हसूलमधील हे फंडिंग नेटवर्क उघडकीस आले.