A parcel of narcotics arrived from Gujarat through travel; 1270 bottles along with the bus were seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पार्सल, कुरियर, ट्रॅव्हल्सद्वारे अमली पदार्थ तस्करी आणि तपासणी यंत्रणेचा अभाव, असे वृत्त पुढारीने मंगळवारी (दि. २६) प्रकाशित केल्यानंतर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. गुजरातहून ट्रॅव्हल्सने आलेले सिरपचे १२७० बाटल्यांचे पार्सल एनडीपीएसच्या पथकाने पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.२९) सकाळी पंचवटी पार्किंगमध्ये केली. तत्पूर्वी गुरुवारी (दि.२८) टीव्हीसेंटर पोलिस कॉलनीच्या पाठीमागे गोदामात साठा करून नशेचा बाजार करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करत तिघांना अटक केली.
मुख्य पुरवठादार इरफान घोरवडे (रा. नांदेड), सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन (३३, रा. बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा), अमजद खान अन्वर खान (३०, रा. इकबाल नगर, नांदेड) अशी अटक आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. इरफान हा कंपनीतून अधिकृत माल घेऊन बाहेर नशेसाठी पेडलर्सना विक्री करत असलयाचे तपासात समोर आले.
अधिक माहितीनुसार, टीव्हीसेंटर भागातील पोलिस कॉलनीच्या पाठीमागे नाल्याजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी पथकासह गुरुवारी छापा मारला. आरोपी सय्यद नाजिरोद्दीन आणि अमजद खान दोघांना पकडले. त्यांच्याकडून ८८ निट्रोसॅन १० नावाच्या गोळ्या, २ औषधीच्या बाटल्या, ०.८० ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केले. त्यांच्या चौकशीत पुरवठादार घोरवडेचे नाव आल्याने त्यालाही अटक केली. जागा मालकाला आरोपी केले आहे.
तिघांना न्यायालयाने २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, घोरवडेने गुजरातच्या अहमदाबाद येथून औषधीचे पार्सल मागविल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे, एपीआय रविकांत गच्चे, पीएसआय पठाण, संदीपान धर्मे, सतिष जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे, काळे यांच्या पथकाने पंचवटी पार्किंगमध्ये सापळा रचला. न्यू पंजाब ट्रॅव्हल्सच्या बसमधून १२७० सिरपच्या बाटल्यांचे पार्सल जप्त केले. बस जप्त करून आयुक्तालयात लावली.
अमजदची सासरवाडी असल्याने तो घोरवडेचे शहरात नेटवर्क सांभाळतो. यापूर्वी पाच गुन्ह्यात आरोपी नजिरोद्दीनला घेऊन शेड उभारले. गेल्या सहा महिन्यापासून धंदा तेजीत सुरु होता. न्यू पंजाब ट्रॅव्हल्समधून अहमदाबाद येथून औषधींचे पार्सल नांदेडच्या पत्त्यावर घोरवडे मागवचा. मात्र ते पार्सल शहरातच उतरून घेतले जायचे. तसेच अन्य ट्रॅव्हल्स, कुरियरने येणाऱ्या पार्सलबाबत तपास केला जात आहे. गतवर्षी एनडीपीएसच्या पथकाने ट्रॅव्हल्समधून येणाऱ्या मिठाईच्या पार्सलमधून ड्रग्स तस्करी उघड करून ट्रॅव्हल्स जप्त केली होती.
2 आरोपी इरफान घोरवडे याने तब्बल १७ वर्षेऔषधी प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम केले. त्यामुळे तो औषधी कंपन्या, मेडिकल चालकांशी नियमित संपर्कात राहायचा. त्यानंतर तो अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी जुडला. दामदुपट्टीचा धंदा असल्याने औषधी पुरवठादाराचा परवाना काढला असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्याला घेऊन गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे हे नांदेड येथे गेले आहे. त्याचे तेथील नेटवर्क व टोळीचे अन्य सदस्य याचा शोध घेतला जात आहे.
3 अन्न औषधी प्रशासनाचे घोरवडेवर आजवर काय कारवाई केली? किती वेळा तपासणी केली हे समोर येणे गरजेचे आहे. थेट कंपनीतून माल मागवून नशेसाठी बाहेर तस्करी होत असल्याने गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात असलेल्या पेडलर्सना पोलिस आरोपी करणार असल्याचे कळते.