Crime News : कामावरून काढल्याच्या रागातून हॉस्पिटलवर टोळक्याचा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : कामावरून काढल्याच्या रागातून हॉस्पिटलवर टोळक्याचा हल्ला

संचालकाला गंभीर मारहाण, कान फोडला; पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

A mob attacked the hospital out of anger over being fired from their jobs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एका खासगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढल्याच्या कारणावरून, तिच्या ओळखीच्या तरुणाने १५-२० जणांच्या टोळक्यासह हॉस्पिटलमध्ये घुसून धुमाकूळ घातला. या हल्ल्यात हॉस्पिटलचे संचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या एका कानाची ऐकण्याची क्षमता गेली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास नक्षत्रवाडी भागातील मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली.

शर्ली भालेराव, प्रवीण विश्वकर्मा, अनोळखी महिला आणि १५ ते २० जणांचे टोळके अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अंकुश आसाराम जाधव (३५) रा. अमृत साई सारा सिटी नक्षत्रवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ते मातोश्री हॉस्पिटलचे संचालक आहेत. त्यांचयकडे डॉक्टर, नर्सिंग, सफाई कामगार, फार्मासिस्ट, रिसेप्शनसह एकूण २२ लोकांचा स्टाफ कामाला आहे. आरोपी शर्ली भालेराव ही महिला रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती.

मात्र, मागील काही दिवसांपासून ती युनिफॉर्म परिधान करत नव्हती, सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायची, रुग्णाची वेळेमध्ये नोंद घेत नव्हती, कर्तव्यावर उशिरा यायची. तिला वेळोवेळी जाधव आणि हॉस्पिटलचे मॅनेजर आकाश पुरी यांनी वर्तवणुकीत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तिच्या वागण्यात बदल झाला नाही. तिच्या कामातील हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलचे संचालक अंकुश जाधव यांनी तिला कामावरून काढण्याचे संकेत दिले होते. याचा राग धरून १६ जानेवारीच्या रात्री प्रबण बिश्वाकर्मा नावाच्या तरुणाने जाधव यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड

शनिवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास, शर्ली भालेराव, प्रबण बिश्वाकर्मा आणि इतर १५ ते २० अन- ोळखी तरुणाचे टोळके हॉस्पिटलमध्ये शिरले. आरोपींनी हॉस्पिटलच्या रिसेप्शन हॉलमध्ये घुसून शिवीगाळ करत तोडफोड केली.

लोखंडी कड्याने कानावर वार

प्रवण बिश्वाकर्मा याने हातातील लोखंडी कड्याने अंकुश जाधव यांच्या डाव्या कानावर जोरात वार केला. तसेच शर्ली भालेराव हिने जाधव यांना हाताने व चपलेने मारहाण करत झाडाची कुंडी अंगावर फेकली. या हल्ल्यानंतर जखमी जाधव यांना घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत जाधव यांच्या डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT