चोरीच्या दुचाकीवरून रेकी करून उघड्या घरातून चोरायचा मोबाईल  file photo
छत्रपती संभाजीनगर

चोरीच्या दुचाकीवरून रेकी करून उघड्या घरातून चोरायचा मोबाईल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : चार महिन्यांपूर्वी बीडहून चिकलठाणा भागात राहायला आलेल्या कुख्यात आरोपीने आधी दुचाकी चोरली. त्यावरून दाट लोकवस्तीच्या भागात पहाटे फिरून रेकी केली. त्यानंतर उघड्या घरातून मोबाईल लंपास करण्याचा सपाटा लावलेल्या या चोरट्याला सिडको पोलिसांनी अखेर जेरबंद केले. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि ११ मोबाईल, असा २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

शेख माजीद शेख गफूर (३६, ह.मु. गल्ली क्र. १, हिनानगर, चिकलठाणा, मूळ रा. शाहूनगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. तो पत्नी आणि दोन मुलांसह चिकलठाणा भागात राहायला आलेला आहे. अधिक माहितीनुसार, सिडको ठाण्याच्या हद्दीत मोबाईल लंपास होण्याचे प्रमाण वाढले होते. नियमित तक्रारदार ठाण्यात येत असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.

पोलिस निरीक्षक अतुल येरमे, विशेष पथकाचे उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे आणि विशाल सोनवणे यांच्या पथकाने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात माजीद शेख हा एका दुचाकीवरून रेकी करून नंतर उघड्या घरातून मोबाईल चोरी करीत असल्याचे उघड झाले.

त्यावरून पथकाने पिसादेवी रोडवरील सनी सेंटर जवळील मोकळ्या मैदानात आरोपी माजीदला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन मोबाईल आढळून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT