A ganja smuggler is caught by Satara police
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गांजाची तस्करी करून परिसरात धूमाकूळ घालणाऱ्या एका गांजा तस्करास सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदारांकडेही मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. लहू कडूबा मोरे (२५ रा. सिंदोण, ता. छ. संभाजीनगर) असे अटकेतील तस्कराचे नाव असून, त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी मोरेकडून दुचाकीसह सुमारे ६ लाख ७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातरा परिसरातील होळकर चौकात गांजा विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सातारा पोलिसांची सापळा रचून लहू मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकी आणि ३८५ ग्राम गांजा मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याचा साथीदार परमेश वरानंद दहहांडे याच्याकडे गेवराई बुद्रुक येथील नगदेश्वर गड परिसरातील होणबाची वाडी येथे गांजा असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तेथे छापा मारून सुमारे ३० किलो गांजा पकडला. दरम्यान परमेश्वरानंद दहिहांडे मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांची दुचाकीसह सुमारे ६ लाख ७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गांजा तस्कारांविरुद्ध सातारा पोलिस गुन्हा दाखल करून दहिहांडेचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख, गोविंद एकिलवाले, निर्मला राख, दिलीप बचाटे, नंदकुमार भंडारे, अण्णासाहेब सातदिवे, जगदीश खंडाळकर, दिगंबर राठोड, महेश गोले, पुरुषोत्तम दायमा, सुनील बेलकर, हमीद पठाण, दीपक शिंदे, दिनेश भुरेवाल, संदीप चिंचोले, सुनील पवार, गंगाधर धनवटे, अविनाश कवाळे आदींच्या पथकाने केली.