A delegation of ambassadors from over 30 countries visits Ajanta Caves
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात रविवारी (दि.२३) पोलिसांचा पहारा होता. तब्बल ३० हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूतांचे प्रतिनिधी मंडळ अजिंठा लेणी भेटीवर आल्याने, पोलिस प्रशासनाने लेणी परिसरात कडेकोट सुरक्षा घेरा तयार केला होता. त्यामुळे शनिवारपासूनच या भागात पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पोलिस प्रशासनाने अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार असलेले फर्दापूर-अजिंठा लेणी टी पॉइंट, अजिंठा लेणीतील प्रमुख लेण्या, वाहन पार्किंग व्ह्यू पॉइंट परिसरात २७ पोलिस अधिकारी १४६ पोलिस अंमलदार व ४१ महिला पोलिस असा तब्बल २४४ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. त अजिंठा लेणी व फर्दापूर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून सुरक्षा निरीक्षण सुरू ठेवण्यात आले होते.
या व्यतिरिक्त शीघ्न कृती दल, बॉम्ब शोधक नाशक पथक, दोन अग्रिशमन दल व तीन रुग्णवाहिके सह वैद्यकीय पथक अजिंठा लेणी सह फर्दापूर टी. पॉइंट व व्ह्यू पॉइंट परिसरात तैनात करण्यात आले होते. यावेळी भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग व महावितरणच्या वतीनेही अजिंठा लेणी परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी ११ वाजता ३० हून अधिक देशातील राजदूतांच्या प्रतिनिधी मंडळाचे कडेकोट पोलिस बंदोबस्तात अजिंठा लेणीत आगमन झाले. त्यानंतर राजदुतांच्या प्रतिनिधी मंडळाचे तीन गट तयार करण्यात आले, कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी गटागटाने अजिंठा लेणीतील लेणी क्रमांक १,२,९, १०, १६, १७, १९ व २६ चे अवलोकन करून गाईड कडून अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे व शिल्प कलेतून दाखविण्यात आलेल्या बौद्ध कला, भारतीय संस्कृती, जातक कथा, भगवान बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंग, त्या काळातील समाजव्यवस्था, राजदरबार, व्यापारी जीवन पद्धती व येथील निसर्गाबाबत माहिती जाणून घेतली येथील २२०० वर्षे जुन्या भित्तिचित्रांमधून दाखविण्यात आलेल्या जातक कथांच्या अद्भूत वर्णनाने राजदूतांचे प्रतिनिधी मंडळ भारावून गेले होते. अजिंठा लेणी अवलोकना नंतर प्रतिनिधी मंडळाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत फर्दापूर टी. पॉइंट व तेथून अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंटकडे प्रयाण केले.
प्रतिनिधी मंडळामुळे सुरक्षा कडक; पर्यटकांना अडचण नाही
प्रतिनिधी मंडळाच्या भेटीमुळे रविवारी अजिंठा लेणी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र याबाबीचा येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास झाला नाही. येथे येणाऱ्या सर्वसामान्य पर्यटकांना रविवारी ही नेहमी प्रमाणेच अजिंठा लेणीचे अवलोकन करून येथील चित्रशैली, शिल्पकले सह निसर्ग सौदर्याचा आनंद लुटता आला. भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहायक अधिकारी मनोज पवार पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक योगेश निरगुडे स्थानीय व्यवस्थापक राज पाटील, शुभम खंडारे सापोनि प्रफुल्ल साबळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले आहे.