Narangi project : नारंगी प्रकल्पात ८५ क्युसेकने विसर्ग  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Narangi project : नारंगी प्रकल्पात ८५ क्युसेकने विसर्ग

वैजापूरकरांना मोठा दिलासा; 'नांमका' कालव्यातही पुन्हा आवर्तन सोडले

पुढारी वृत्तसेवा

85 cusecs of water discharged at Narangi project

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातील डाव्या कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले. सध्या ८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून जोपर्यंत नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, तोपर्यंतच हे अतिरिक्त पाणी नारंगीत सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा नारंगी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

याशिवाय नांदूर मधमेश्वर कालव्यातही पुन्हा आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, नारंगीत अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे वैजापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच लाभक्षेत्रातील २२ गावांतील पिण्याचा प्रश्न मार्गी लागून सिंचनासाठी या पाण्याचा फायदा होईल.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून, ती ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीमध्ये सोडले. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होऊन त्यातूनही पुन्हा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले असून, सध्या ८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेडचे पाणी नारंगी मध्यम प्रकल्पाकडे झेपावत असून, वैजापूरकरांना केवळ अतिरिक्तच पाणी मिळणार आहे.

दरम्यान नजीकच्या येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून पाणी सुरू होते. कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून खामगाव व उक्कडगाव परिसरातील बंधारे भरले जातात. येथील नारंगी मध्यम प्रकल्पात २२ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले होते. पालखेड ते नारंगी १२८ किलोमीटर अंतर असून, ११० किलोमीटरपर्यंत १३५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तेथून पुढे ८५ क्युसेकने विसर्ग नारंगीकडे झेपावत आहे.

दरम्यान, नांदूर मधमेश्वर कालव्यातही पाणी सोडण्यात आले असून, सध्या ६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जोपर्यंत पाऊस सुरू आहे, तोपर्यंत कालव्यात पाणी सुरू ठेवण्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाला आदेश आले आहेत.

चारीच्या कामासाठी ३८ कोटी खर्च...

नारंगीत ४८५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. येवला तालुक्यातून नारंगी प्रकल्पात येणाऱ्या चारीची वहनक्षमता केवळ ८५ क्युसेक आहे. यापूर्वी चारीची वहनक्षमता ४५ ते ५० क्युसेक वहनक्षमता होती. परंतु आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून चारीच्या कामासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. चारीची वहनक्षमता वाढली आहे. कदाचित येत्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात आणखी पाऊस पडला तर नारंगीत पालखेडचे अतिरिक्त पाणी जास्त दिवस सोडले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT