7 people died after being swept away by flood waters in Kannada taluka
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना मोठा पूर आला होता. त्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन कन्नड तालुक्यातील चिकलठाण, निपाणी, टाकळी शाहू (बुद्रुक) लव्हाळी, कन्नड, गराडा, पिशोर आदी गावांतील सात जणांचे मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटना घडल्या आहे.
चिकलठाण येथील गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात १६ सप्टेंबर रोजी दुपारी संजय आसाराम दळे (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. लव्हाळी येथील भारत रावसाहेब डगळे (३८) या तरुण शेतकऱ्याचा शिवना नदीच्या पात्रात पाय घसरून पाण्यात वाहून जाऊन १९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. तर साहेबराव नथ्थू दहीहंडे (४८), टाकळी बुद्रुक (शाहू) या शेतकऱ्यांचा अंजना नदीवरील पुलावरून नदीत पडून पाण्यात बुडून २३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
शहरातील शिवनगर येथील शिवना नदीवरील केटी येथे आंघोळीसाठी गेलेल्या आयन शेख खाजू (११) या मुलाचा २४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. तर निपाणी येथील प्राचंल प्रकाश कदम (८) ही मुलगी चिमणधडी नदीत वाहून गेली होती. तिचा मृतदेह ३० सप्टेंबर रोजी मिळून आला. पिशोर श्रावण निवृत्ती मोकासे (१०) हा २९ सप्टेंबर रोजी अंजना नदीवरील पुलावरून पडून वाहून गेला होता. त्याचा मृतदेह गुरुवारी (दि.२) सकाळी सहा वाजेच्यासुमारास नदी पात्रात मिळुन आला. तर गराडा येथील मदन झब्बु राठोड (५५) हे ब्राम्हणी गराडा शिवना नदीवील पुलावरून जात असताना पाय घसरुन ते २७ सप्टेंबर रोजी शिवना नदीत वाहून गेले होते. त्यांच्या मृतदेह तब्बल सात दिवसानंतर तालुक्यातील भोकनगाव शिवारात मिळून आला.
५ मयतांच्या कुटुंबाला मदत तालुक्यातील चिकलठाण, टाकळी बुद्रुक, निपाणी, लव्हाळी, कन्नड या पाच मयतांच्या वारसांना आम्ही चार लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. पिशोर येथील श्रावण मोकासे, मदन झब्बु राठोड या दोघाचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाले. त्याच्या वारसांचेही धनादेश तयार केले असून, ते शुक्रवारी देण्यात येईल.विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड