63 shops operating without a license: Rent collected ranges from ₹20,000 to ₹30,000 each
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सण-उत्सवांच्या काळात तात्पुरती दुकाने उभारण्यासाठी व्यापाऱ्यांना महापालिकेची परवानगी देऊन चार-पाच दिवसांचे शुल्क वसूल करण्याचे धोरण असतानाही गजानन महाराज मंदिर परिसरात या धोरणाचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. परिसरातील ८६ दुकानांपैकी अवघ्या २३ दुकानदारांनी मनपाची परवानगी घेतली असून, तब्बल ६३ दुकाने विनापरवाना सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एका खासगी व्यक्तीकडून या दुकानांसाठी विक्रेत्यांकडून तब्बल २० ते ३० हजार रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
गजानन महाराज मंदिर परिसरातील तात्पुरत्या दुकानांचे भाडे यापूर्वी राजकीय कार्यकर्त्यांकडून वसूल केले जात होते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत कोणताही महसूल जमा होत नव्हता. ही पद्धत बंद करून व्यापाऱ्यांना थेट महापालिकेकडून तात्पुरती परवानगी देऊन मनपाचा महसूल वाढवावा, अशी मागणी नगरसेवक नंदलाल गवळी, कमल थोरात, सुमित्रा म्हात्रे आणि सुरेंद्र कुलकर्णी यांनी केली होती.
नगरसेवकांच्या या मागणीला आयुक्त अमोल येडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सण-उत्सवांच्या काळात व्यापाऱ्यांना तात्पुरत्या दुकानांसाठी परवानगी देण्याचे निर्देश सर्व झोन कार्यालयांना दिले होते. मात्र, गजानन महाराज मंदिर परिसरात या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तात्पुरती दुकाने उभारण्यात आली आहेत. मात्र, एका व्यक्तीने अनेक दुकाने उभारून ती व्यापाऱ्यांना भाड्याने दिली असून, त्यासाठी प्रत्येकी २० ते ३० हजार रुपये घेतले जात असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. तसेच काही विक्रेत्यांनी मनपाची अधिकृत परवानगी घेतली असली, तरी बहुतांश दुकानदारांकडून खासगी पातळीवर पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकीकडे महापालिकेचा महसूल बुडत असताना दुसरीकडे खासगी वसुलीला मोकळे रान मिळाल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून परिसरातील सर्व दुकानांची तपासणी करावी, विनापरवाना दुकानांना नियमानुसार परवानगी देऊन अधिकृत शुल्क वसूल करावे आणि खासगी व्यक्तीकडून सुरू असलेल्या कथित वसुलीला आळा घालावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. खासगी व्यक्तींना वसुली मुभा दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.