लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल File Photo
छत्रपती संभाजीनगर

लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

सहकार क्षेत्रात घोटाळ्यांची मालिका सुरूच; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

पुढारी वृत्तसेवा

₹6 Crore Scam at Lok Adarsh ​​Credit Society; Case Filed Against 11 Individuals, Including Chairman Pathan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सहकार क्षेत्रात घोटाळ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. लोक आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ५ कोटी ९६ लाख ८३ हजार २२१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष अनिस समद पठाण यांच्यासह उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळातील ११ जणांविरुद्ध एमपीआयडीसह विविध कलमान्वये सोमवारी (दि. ३०) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक द्वारकादास इधाटे यांनी लोक आदर्श पतसंस्थेचे १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. या तपासणीत शहागंज येथील मुख्य शाखेसह विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या रेल्वेस्टेशन आणि चितेगाव (ता. पैठण) येथील शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली.

संस्थेचे अध्यक्ष अनिस पठाण यांनी सॉफ्टवेअरचा अॅडमिन आयडी स्वतः कडे ठेवून एकहाती कारभार करत हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत. दरम्यान, या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, आर्थिक गुन्हे शाखा आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करत आहे.

घोटाळ्यात ठेवीदार देशोधडीला पतसंस्था, मल्टीस्टेट मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी आयुष्यभराची जमापूंजी ठेवलेल्या ठेवीदारांचे कंबरडे मोडले आहे. यात बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा सर्वात मोठा घोटाळा, त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था, राजस्थानी मल्टीस्टेट, अजिंठा अर्बन, ज्ञानोबा पतसंस्था, यशस्वीनी, देवाई, आभा, राधाई अर्बन, मलकापूर अर्बन, बीडची छत्रपती मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून मालमत्ता जप्ती आणि आरोपींवर कारवाई सुरू असली तरी ठेवीदारांना अजूनही पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही.

निधी कंपनीचे व्यवहार घुसडले लोक आदर्श अर्बन निधी लि. कंपनीचे आर्थिक व्यवहार बेकायदा पतसंस्थेच्या रेकॉर्डवर दाखवून बोगस व्हाऊचरद्वारे १ कोटी २८ लाख ३४ हजार ३६४ रुपयांचे येणे दाखवण्यात आले. लोक आदर्श अर्बन निधीकडील ३५ कर्जदारांचे खोटे रेकॉर्ड तयार करून ३१ मे २०२२ रोजी एकाच व्हॉवचरद्वारे ९३ लाख ५९ हजार ४६० रुपयांचा गैरव्यवहार केला.

शाखेला टाळे लावून पसार गेल्या काही महिन्यांपासून लोकआदर्शच्या शाखेला टाळे लागले आहे. अध्यक्षासह आरोपी पसार झाले आहेत. त्यामुळे पतसंस्थेत किती ठेवीदार, खातेदार, कर्जदार यासह गुन्ह्याशी संबंधित सर्व माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मागविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. त्यानंतरच घोटाळ्याची व्याप्ती स्पष्ट होईल. अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणारे फंडे; असा झाला घोटाळा

बोगस कर्ज वाटप : सन २०२२-२४ काळात तिन्ही शाखांत

बोगस कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या नावे ६०.४३ लाख रुपयांचे कर्ज दाखवून रोख उचल करण्यात आली. तसेच मुदत ठेवींच्या नावाखाली १५.९० लाखांचे बोगस कर्ज वाटले. तसेच स्वतःच्या (बोगस कर्मचारी म्हणून) आणि इतर व्यक्तींच्या नावाने बोगसरीत्या संगणकीय व्हाऊचर तयार करण्यात आले.

वेतनाच्या नावाखाली डल्लाः अध्यक्ष अनिस पठाण, उपाध्यक्ष सय्यद एजाज आणि सचिव शेख विखार यांनी स्वतः लाच व्यवस्थापक व कर्मचारी दाखवून १९.६० लाख रुपये वेतनापोटी हडप केले.

नातेवाइकांच्या फर्ममध्ये पैसे अध्यक्षांनी त्यांच्या सुंदरम फूट आणि ए.एस. एंटरप्राइजेस या फर्ममध्ये ३०.६६ लाख रुपये, तर सचिवांनी सना बुटीक या नातेवाइकाच्या फर्ममध्ये ४.८५ लाख रुपये वळवले.

ठेवीदारांची थेट फसवणूक : राजू पठाण यांच्याकडून घेतलेले २० लाख रुपये संस्थेत जमा न करता स्वतःच्या बँक खात्यात भरले. तसेच शेख रुखसाना यांच्या ४० लाखांच्या ठेवींची नोंद बँकेत न करता परस्पर लाटली आणि त्यांना बनावट मुदत ठेव पावत्या दिल्या.

पिग्मी व बचत खात्यांतून लूट पुरेशी रक्कम शिल्लक नसताना ७ बचत खातेदार आणि ३ पिग्मी खातेदारांच्या नावे बोगस व्हाऊचर फाडून ७ लाख ५३ हजार ५६९ रुपयांचा अपहार केला. तसेच रेल्वेस्टेशन शाखेतील ४३ पिग्मी खातेदारांच्या नावे १९,२९० रुपये बोगस व्हाऊचरद्वारे लाटले.

बोगस मुदत ठेवी : विष्णू क्षीरसागर यांच्या नावे बोगस खाते उघडून समीर पठाण यांच्या नावे ४६ लाखांची खोटी मुदत ठेव दाखवली. तसेच बिगर सभासद जुनेदखाँ यांच्या नावे ८.४० लाखांची बनावट एफडी दाखवून अपहार केला.

बैंक नोंदीत फेरफार ५ लाख रुपये बँकेत जमा न करताच, बँक ऑफ महाराष्ट्रच्या लेजरला नावे टाकून संस्था व्यवस्थापिकेला बोगस मुदत ठेव पावती दिली.

बोगस व्याज उचल संचालक असदखाँ पठाण यांच्या लेजरचा वापर करून खोट्या मुदत ठेवी तयार केल्या. त्यावर मासिक व्याज आकारून अध्यक्षांनी ३३ लाख ६० हजार ८४७रुपये रोखीने आणि एनइएफटीद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी उचलले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT