5 sandalwood smugglers caught by local crime branch
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चंदन तस्कर पोलिसांना आव्हान देत चंदनाची चोरी करत होते. अशीच एक पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. पाचोड परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत या टोळीकडून ५ लाख ३२ हजार रुपयांचे चंदन, रोख रक्कम व वाहन असा ९ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नजीम मनीर खान (जोनवाल) (२०), मोईन खाँ बिस्मिल्ला खाँ (३२), नसीब खाँ मुनीर खाँ (जोनवाल) (३२), अनिस युनुस खाँ (३२) आणि जावेद खाँ गौष खाँ (३३, सर्व रा. आडगाव माऊली ता.जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
चंदन तस्कारांची टोळी पाचोड शिवारात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी (दि. २७) संशयित स्कॉर्पिओ (एमएच-२८-व्ही-४००१) ची तपासणी केली असता गाडीतून मोठ्या प्रमाणावर चंदन आढळून आले. गाडीच्या झडतीत ५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे १३३ किलो चंदन, झाडे तोडण्याचे साहित्य, करवत, कुऱ्हाड, दोरी, कार, मोबाइल असा सुमारे ९ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच नजीम मनीर खान, मोईन खाँ बिस्मिल्ला खाँ, नसीब खाँ मुनीर खाँ, अनीस युनुस खाँ आणि जावेद खाँ गौष खाँ या पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णासिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष मिसळे, हवालदार विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, सुनील गोरे, समाधान दुबिले आदींनी केली.