4th grade girl molested by teacher by showing pornographic video
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चौथीत शिकणाऱ्या मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीमधील रांजणगाव शेणपुंजी येथे उघडकीस आला. या घटनेमुळे मुलीच्या पालकांनी संतप्त होऊन शिक्षकाला बेदम मारहाण केली.
सुभाष जाधव असे आरोपीचे नाव आहे. मारहाणीमुळे जबर जखमी झालेल्या शिक्षकावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीचे वडील हे बिहार येथील असून, गेल्या १० वर्षांपासून ते रांजणगावात राहतात. त्यांना तीन अपत्ये आहेत. त्यांची १० वर्षांची मुलगी ही परिसरातील एका शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेते. वडिलांनी तिला रांजणगाव परिसरातील टॉपर कोचिंग क्लासेसमध्ये खासगी शिकवणीसाठी पाठविले.
गेल्या तीन दिवसांपासून आरोपी शिक्षक सुभाष जाधव हा मुलीला बाथरूममध्ये नेऊन मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत होता. त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने ट्यूशनला जाण्यास नकार दिला. आईने का जाणार नाही, असे विचारल्यास मुलीने सुभाष जाधव याने केलेल्या घृष्णास्पद कृत्याची माहिती दिली. हा प्रकार समजताच पालकांनी जाधवला बेदम चोप दिला. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या जाधववर घाटीत उपचार सुरू आहेत.
नराधम सुभाष जाधव हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे एमएड झालेले आहे. दीड वर्षापूर्वी तो एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्याच्या गैरकृत्याबद्दल शाळेने त्याला कामावरून कमी केले होते असे सांगण्यात आले. त्याने तिघांमध्ये रांजणगावात टॉपर नावाने कोचिंग क्लासेस सुरू केले होते. त्याच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.