3591 faulty EVMs from Marathwada deposited in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित : ईव्हीएम मशीन सज्ज करण्यात येत आहेत. मराठवाड्यात तब्बल ३५९१ ईव्हीएम मशीन नादुरुस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व मशीन दुरुस्तीसाठी छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आल्या आहेत. आता बंगळूरू येथील अभियंत्यांकडून या मशीनची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
राज्यात मागील पाच वर्षांपासून महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सद्यस्थितीत राज्यातील सुमारे साडेसहाशे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने मागील तीन महिन्यांपासून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगरात येऊन मराठवाड्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. त्यावेळी विभागात ३५९१ ईव्हीएम मशीन नादुरुस्त असल्याचे आढळून आले. आता सर्व मशीन दुरुस्तीसाठी छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आल्या आहेत. लवकरच बंगळूरू येथील ईसीआयएल कंपनीचे अभियंते छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत. त्यानंतर या मशीन दुरुस्त करून निवडणुकीसाठी सज्ज करण्यात येणार आहेत.
विभागवार आढावा बैठकीनिमित्त विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांकडून त्यांच्या असलेल्या मतदान यंत्रांची, त्यातील नादुरुस्त यंत्रांची माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्यात एकूण ७१ हजार ३३५ कंट्रोल युनीट (सीयू) आणि ७३ हजार ७ बॅलेट युनीट (बीयू) उपलब्ध आहेत.