340 brass sand stock seized in Savangi area
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गौण खनिज चोरी विरोधात जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाईही करण्यात येत आहे. मात्र तरीही प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच भालगाव परिसरात तब्बल ९०० ब्रास वाळू साठा जप्त केला असतानाच, शनिवारी (दि.१४) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सावंगी परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आलेला ३५० ब्रासपेक्षा अधिक वाळूचा साठा जप्त करण्यात आला.
प्रभारी जिल्हा गौण खनिज अधिकारी अनिल घनसावंत यांच्यासह नायब तहसीलदार कैलास वाघमारे यांनी सावंगी आणि तुळजापूर परिसरात जाऊन ही कारवाई केली. सावंगी परिसरातील गट नंबर ४० मध्ये तर तुळजापूर परिसरातील गट नंबर ६६ मध्ये हे वाळूसाठे होते. अधिकाऱ्यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी याना घटनास्थळी बोलावून घेत पंचनामा करण्याचे आदेश दिले.
पंचनाम्यात फक्त ३४० ब्रास वाळू जप्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पंचनाम्यावर संतोष बोडखे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या सह्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी गौण खनिज विभागाची बैठक घेत अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश बसविण्याच्या कडक सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही कारवायादेखील झाल्या. यामुळे अवैध वाळू वाहतूकीवर काही प्रमाणात अंकुश बसला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा हा प्रकार सुरू झाला आहे.
66 जिल्हा गौण खनिज विभागाने याठिकाणी कारवाई करून वाळू जप्त केली आहे. या वाळूचा मालक अद्याप सापडला नाही. आम्ही वाळू जप्त केली असून त्याला मार्किंग केले आहे. याठिकाणी कोणी संरक्षणाला ठेवणे शक्य नाही मात्र वाळू चोरी करण्यात आली तर जमीन मालकावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.रमेश मुनलोड, तहसीलदार