283 teachers are surplus in the district, yet 13 posts remain vacant in Vaijapur!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षक नियोजनातील विसंगतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा बुधवारी (दि. ४) स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. जिल्ह्यात २८३ शिक्षक अतिरिक्त असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना वैजापूर तालुक्यात सहशिक्षकांची तब्बल १३ पदे जूनपासून रिक्त आहेत. एका बाजूला अतिरिक्त शिक्षकांची संख्या आणि दूसरीकडे शाळांमधील रिक्त पदे, या विरोधाभासावर जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि मनोज गायके यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.४) वेरूळ येथील सभागृहात ही बैठक झाली. उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, बांधकाम सभापती सचिन गरड, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, शिक्षण सभापती अनिता मोठे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी पवार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच वैजापूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित झाला.
बोरसरसह विविध शाळांमध्ये गणित विषयाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी २०२१ पासून प्रलंबित असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. शैक्षणिक वर्षाचे सहा महिने उलटूनही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठका कशासाठी घेता?
शिक्षक नियुक्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही निर्णय होत नसेल, तर स्थायी समितीच्या बैठका घेण्याचा उपयोग काय, असा सवाल मनोज गायके यांनी केला. आठ महिन्यांपासून मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने आजच्या आज नियुक्तीचे आदेश द्यावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार ?
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत रिक्त जागांवर तात्पुरती नियुक्ती का केली जात नाही, असा सवालही उपस्थित झाला. शिक्षकांची उपलब्धता आणि रिक्त पदांचे नियोजन करणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी असताना प्रत्येक बैठकीत तोच प्रश्न उपस्थित करावा लागत असल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ आश्वासने न देता प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
२८३ अतिरिक्त, मग १३ जागा रिक्त कशा?
वैजापूर तालुक्यात पानवी खंडाळा, बोरसर, आगूर, लाडगाव, लोणी खुर्द, मालगाव, परसोडा आणि विरगाव यांसह विविध शाळांमध्ये सहशिक्षकांची पदे रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यात २८३ शिक्षक अतिरिक्त असताना १३ जागा रिक्त कशा राहतात, असा सवाल सदस्यांनी केला. यावर अधिकाऱ्यांनी सहशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मंजूर पदांची रचना वेगवेगळी असल्याचे सांगत समायोजन प्रक्रियेचा दाखला दिला. मात्र, सदस्यांनी सहशिक्षकांच्या रिक्त पदांबाबत स्पष्ट उत्तर देण्याचा आग्रह धरला.