2,495 SIM cards in the name of 618 tribals; Three in digital arrest racket denied bail
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नंदुरबार जिल्ह्यातील नटावद गावातील अशिक्षित आदिवासींच्या नावे सिम कार्ड त्यांच्या अॅक्टिव्हेट करून अनेकांना डिजिटल अरेस्टच्या धमक्या देऊन आरोपींनी करोडो रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती नंदुरबारच्या सायबर गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आली आहे. या गुन्ह्यातील १२ आरोपींपैकी ३ आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केले असता, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी त्यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. पंकज मेघराज कुकरेजा, दिलीप शामलाल आहुजा आणि निकेष जयसिंग वळवी अशी आरोपींची नावे आहेत.
विशिष्ट क्रमांकाच्या मोबाईलवरून डिजिटल अरेस्टच्या धमक्या येत असल्याच्या अनेक तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना ऑनलाईन पोर्टलवर आल्या आहेत. ते संशयित मोबाईल क्रमांक संबंधित मोबाईल कंपनीला पाठविल्यानंतर त्यांनी त्या क्रमांकाचे सिम कार्ड डीअक्टिव्हेट करून याची चौकशी करा, अशी विनंती सायबर शाखा आणि नंदुरबारचे पोलिस अधीक्षक यांना केली होती.
पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, नंदुरबार जिल्ह्यातील नटावद गावातील अशिक्षित मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांना कसलीही माहिती नसता त्यांच्या नावाने त्याच गावातील स्थानिक सिम कार्ड विक्रेत्याच्या दुकानातून हजारो सिम कार्ड अॅक्टिव्हेट झाले. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने संशय व्यक्त केलेले हेच सिम कार्ड होते, असे निष्पन्न झाले. यावरून नंदुरबार येथील उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोबाईल कंपनीचे काही अधिकारी, वितरक, स्थानिक विक्रेते आणि सिम कार्ड अॅक्टिव्हेशनची संबंध नसलेल्या दोन व्यक्ती अशा एकूण बारा आरोपींचा समावेश होता. तपासाअंती त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
स्थानिक विक्रेते आणि बनावट बँक खाते उघडून त्या खात्यामधून सायबर गुन्ह्याद्वारे हडप केलेल्या रकमेचा लाभघेतला, अशा व्यक्तींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात वरील तीन आरोपींचाही अर्ज होता. त्यांच्या जामीन अर्जाना विरोध करताना शासकीय अभियोक्ता संजय घायाळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदरचा गुन्हा हा केवळ देशव्यापी नाही तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे.
यातील आरोपींनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, आंध्र, बिहार, केरळ, कर्नाटक आदी ठिकाणातील मोबाईलधारकांना डिजिटल अॅरेस्टच्या धमक्या देऊन वरील आदिवासींच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यांमधून जमा केलेली रक्कम आरोपींनी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या बँक खात्यात वळवून घेतली. याचा पुरावा न्यायालयासमोर मांडला. अशा प्रकारचे गुन्हे सध्या प्रचंड प्रमाणात वाढले असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न आरोपी करीत आहेत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपींनी एकेका व्यक्तीच्या नावे 20 ते 45 सिम कार्ड असे 618 लोकांच्या नावाने 2495 सिम कार्ड खरेदी केल्याचे आणि हे सिम कार्ड वापरून मोबाईलद्वारे धमक्या देऊन एक कोटी 40 लाख 57 हजार 769 रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले आहे.