238 crore dues with 4 lakh electricity consumers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महावितरणने वीज बिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ४ लाख २६ हजार ग्राहकांकडे २३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. अनधिकृत वीज पुरवठा आढळल्यास गुन्हा नोंदवण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ४ लाख २६ हजार ग्राहकांकडे २३८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १ लाख १२ हजार ७८ ग्राहकांकडे ५० कोटी ८९ लाख, ग्रामीण मंडलातील १ लाख ८६ हजार ८८२ ग्राहकांकडे ६२ कोटी ४३ लाख व जालना मंडलातील १ लाख २७ हजार ५३२ ग्राहकांकडे १२५ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शहर, ग्रामीण व जालना मंडलात वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसूल करत आहेत.
जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरीत्या वीज वापरत असेल तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सुटीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार आहे. तरी ग्राहकांनी थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.