1816 nomination forms were sold on the very first day.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज विक्री आणि भरणा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यात पहिल्याच दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेदरम्यान ९ निवडणूक कार्यालय इच्छुकांनी गर्दी केली होती. सहा तासांत तब्बल १ हजार ८१६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले. तर येत्या ३० डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री आणि भरणा करण्याची प्रक्रिया होणार आहे. पहिला दिवस आल्याने एकाचाही अर्ज प्राप्त झाला नाही.
महापालिकेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनंतर होत आहेत. त्यात यंदा प्रभागनिहाय निवडणुका होत असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी उसळली आहे. या निवडणुकीसाठी आज मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि भरणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने ९ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू केली आहेत.
या कार्यालयांतूनच अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. मनपाच्या २९ प्रभागांमधून ११५ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत.
२८ प्रभागांतून प्रत्येकी चार तर एका प्रभागातून तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. महापालिकेने नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही, मात्र १८१६ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.