पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण येथील नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे पुन्हा एकदा आज (बुधवार) दि.२५ रोजी सकाळी उघडले. गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाने सुरू केला आहे. (Nathsagar Dam)
नाथसागर धरणाच्या वरील भागात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. येथील धरणात पाण्याची आवक जमा होत असल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी आज (बुधवार) रोजी सकाळी धरणाचे २७ पैकी क्रमांक १३,२४,१५,२२,१७,२० हे १८ दरवाजे ०५ फुट उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान झाला आहे.
बुधवारी सकाळी या धरणात एकूण २९०४.२६५ दलघमी पाणीसाठा आहे. पाण्याची टक्केवारी ९९.७८ असल्याने येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्याचे नियोजन नियंत्रण कक्षातून करण्यात आले. यंदा नाथसागर धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत.