17 bullets seized for bursting crackers; 77 people fined
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर लावून फटाक्यांचे आवाज काढणाऱ्यावर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी विशेष मोहीम राबवून अशा बुलेट जप्त करण्याचा आदेश देत शुक्रवारी (दि. ३) वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर कारवाई करून ७७ हजारांचा दंड लावला. १७बुलेट जप्त केल्या. यापूर्वीचा प्रलंबित ९७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एसीपी सुभाष भुजंग यांनी दिली.
शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे एसीपी सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक अमोल देवकर, राजेश यादव, एपीआय सुनील कराळे, सचिन मिरधे, पीएसआय दीपक ढोणे, उत्तरेश्वर मुंढे यांच्यासह अधिकारी, अंमलदारानी चौकाचौकांत बुलेटस्वारांवर दुपारी १२ ते २ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत कारवाई केली. नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर यापुढेही सातत्याने विशेष मोहिमा राबवून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.