15,500 Duplicate Names in Gangapur-Khultabad Constituency
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुद्धीकरणाला वेग आला आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल १५ हजार ५५१ मतदारांची दुबार नावे आढळून आली असून, त्यापैकी २४२ नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून नोंदींची सखोल पडताळणी सुरू आहे. एकाच व्यक्तीची नावे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा भिन्न स्वरूपात नोंद झाल्यास ती दुरुस्त किंवा वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नायब तहसीलदार मयुरी पेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसई प्रक्रियेंतर्गत आयोगाकडून संबंधित मतदारांना फॉर्म ए व संमतीपत्र पोस्टाद्वारे पाठवले जाते. मतदाराच्या संमतीनुसार नाव योग्य ठिकाणी कायम ठेवले जाते, तर दुसऱ्या ठिकाणचे नाव फॉर्म क्रमांक ७ द्वारे वगळले जाते. ही प्रक्रिया बीएलओमार्फत पार पाडली जाते.
बनावट नोंदणीला बसणार आळा
या उपक्रमामुळे मतदार यादीतील दुवार व बनावट नोंदींवर आळा बसून केवळ पात्र मतदारांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. परिणामी, आगामी निवडणुका अधिक पारदर्शक, अचूक व निष्पक्ष पद्धतीने पार पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.