Dog Bite News : सिडकोत पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Dog Bite News : सिडकोत पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा

जखमींना हलवले घाटी रुग्णालयात : रात्री उशिरापर्यंत मनपाच्या पथकाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

14 people bitten by a dog that was crushed in CIDCO

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका पिसाळलेल्या कुत्र्याने १४ जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी (दि. १७) सिडको एन-७ मधील पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मुकुल मंदिर शाळेच्या परिसरात घडली. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती महापालिका पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतरही पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मनपाचे पथक पोहोचलेले नव्हते.

सिडको एन-७ मधील मुकुल मंदिर परिसरातील नागरिक रविवार असल्यामुळे सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. तर लहान मुले व तरुण मंडळी त्या भागात खेळत होती. दरम्यान अचानक पिसाळलेला कुत्रा रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना चावा घेत सुटला.

लहान मुले, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही कुत्र्याने चावा घेत दहशत निर्माण केली. तब्बल १४ जणांना चावा घेऊन जखमी केले. कुत्रा चावा घेत असल्याने नागरिकांना काही कळण्याच्या आतच तो दुसऱ्याला चावा घेऊन पळून जात होता. पिसाळलेला कुत्रा आल्याचे परिसरातील नागरिक जोरात ओरडून एकमेकांना सांगत होते. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र तांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांना मिळेल त्या वाहनाने तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

त्यानंतर मनपाच्या पशुसंवर्धन विभागाकडे डॉग व्हॅन पाठविण्याची विनंती केली. मात्र रविवार असल्याने कर्मचारी दुपारी घरी निघून गेले. त्यामुळे कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारी नसल्याने उद्या सोमवारी सकाळी डॉग व्हॅन पाठवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रवींद्र तांगडे यांनी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांमध्ये दहशत

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे मुकूल मंदिर शाळा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना घराबाहेरही पडू दिले जात नाही. महिलाही भयभीत झाल्या होत्या. घराघरांत पिसाळलेल्या कुत्र्याची चर्चा सुरू होती. साधे कुत्रे दिसले तरी मुले धूम ठोकत असल्याचे पहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT