गंगापूर : कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत तालुक्यात शेतकरी मित्र पदासाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी ३० टक्के महिला आरक्षणाची सोडत गुरुवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली. तालुक्यातील एकूण ४८ कृषी सजांपैकी १४ कृषी सजा महिलांसाठी राखीव करण्यात आले असून, उर्वरित ३४ सजांसाठी महिला व पुरुष दोघांनाही अर्ज करता येणार आहेत.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी दादासाहेब राठोड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुक्यातील एकूण ४८ कृषी सजांपैकी ३० टक्के म्हणजे १४ सजा महिलांसाठी राखीव करण्यात येत असल्याची माहिती दिली.
त्यानंतर तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांनी सर्व ४८ कृषी सजांची नावे उपस्थितांसमोर वाचून दाखविली. संबंधित गावांच्या नावांच्या स्वतंत्र चिठ्ठया तयार करून त्या पारदर्शक बरणीत टाकण्यात आल्या. उपस्थित शेतकरी, लोकप्रतिनिधी, महिला शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. ही प्रक्रिया ऑन कॅमेरा पार पडली असून, लॉटरीतून निवडण्यात आलेली नावे सर्वांसमोर जाहीर करण्यात आली.
सोडतीनुसार पेंढापूर, सावखेडा, वरखेड, काटेपिंपळगाव, हसूल, माळीवडगाव, धामोरी खुर्द, वाळूज, वाहेगाव, गंगापूर, शिंगी, बुटेवडगाव, ढोरेगाव व मांगेगाव या १४ कृषी सजांमध्ये शेतकरी मित्र पदासाठी महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
शेतकरी मित्र पदासाठीचे अर्ज गावपातळीवरील ग्राम विकास कृषी समिती (जीकेव्हीएस) यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. अर्ज स्वीकारण्याबाबत स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी जायभाय यांनी सांगितले. जीकेव्हीएस समित्यांकडे प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व गुणांच्या आधारे शिफारस तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाणार असून, त्यानंतर अंतिम निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अर्ज छाननी व निवडीच्या तारखांबाबत स्वतंत्र वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक शिरसाठ, लक्ष्मण भुसारे, माजी नगरसेवक रावसाहेब तोगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला आरक्षणासाठी निश्चित १४ कृषी सजा
पेंढापूर, सावखेडा, वरखेड, काटेपिंपळगाव, हसूल, माळीवाडगाव, धामोरी खुर्द, वाळूज, वाहेगाव, गंगापूर, शिंगी, बुट्टेवाडगाव, ढोरेगाव व मांगेगाव.