Sambhajinagar News : शहरात 5 रस्त्यांवर आणखी 12 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहरात 5 रस्त्यांवर आणखी 12 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग

पेडकोकडून डीपीआरचे सादरीकरण, २ ठिकाणी डबलडेकर पुलाची शिफारस

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेत महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवरील मालमत्ता जमीनदोस्त केल्या. या रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी पेडको एजन्सीची नियुक्ती केली असून, या एजन्सीने गुरुवारी (दि. १६) स्मार्ट सिटीच्या कार्यालयात प्रशासक जी. श्रीकांत यांच्यापुढे आराखड्याचे सादरीकरण केले. यात जालना रोडवर आणखी ३ उड्डाणपूल एका भुयारी मार्गाची तर जळगाव रोड, पैठण रोड, बीड बायपास, पडेगाव रोडवर ९ उड्डाणपुलांसह २ भुयारी मार्ग उभारण्याची शिफारस केली आहे. लवकरच हा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, शहर अभियंता फारुख खान, ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता संजय कोबडे, अनिल तनपुरे, वसंत भोये, पेडेकोचे प्रतिनिधी विजय पवार यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई), सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि महावितरणाचे अधिकारी उपस्थित होते. विकास योजनेनुसार रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने प्रमुख पाच रस्त्यांवर पाडापाडी केली. त्यात पडेगाव मिटमिटा रस्ता , पैठण रस्ता, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता, जालना रोड, जळगाव रोड या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची वेळोवेळी चर्चा केल्यानंतर त्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यावरून हा आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने शासनाच्या पेडेको या एजन्सीची नियुक्ती केली होती. या एजन्सीने केवळ दोन महिन्यांत शहराच्या पाचही रस्त्यांवर माती परीक्षण करून सविस्तर अहवाल तयार केला. या अहवालाचे गुरुवारी प्रशासकांपुढे सादरीकरण करण्यात आले.

>> जालना रोडवर ३ उड्डाणपूल

जालना रोडवर सध्या चार ठिकाणी उड्डाणपूल आहे. त्यात आणखी तीन उड्डाणपुलांची शिफारस पेडेकोने केली आहे. यात हायकोर्टच्या सिग्नलजवळ, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल ते सुखना नदीचा पूल या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारावे, असे नमूद केले.

▶▶ पैठण रोडवर डबलडेकर पूल

पैठण रोडवर सध्या अस्तित्वात असलेला रेल्वेस्टेशनचा उड्डाणपूल महानुभाव आश्रमपर्यंत वाढविण्यात यावा. तर नक्षत्रवाडी ते बिडकीनदरम्यान डबल डेक्कर उड्डाणपूल तयार करावा.

>> बीड बायपासवर आणखी ३ पूल

बीड बायपास रस्त्यावर सध्या तीन ठिकाणी उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. त्यासोबतच आणखी तीन ठिकाणी पेडेकोने उड्डाणपूल उभारण्याबाबत शिफारस केली आहे.

▶▶ नगर नाका ते दौलताबाद टी पाइंट

महावीर चौक ते पडेगावदरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची, तर नगर नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सैन्य दलाचे मैदान, कार्यालय, कॅन्टीनसाठी भुयारी मार्ग टाकण्याची शिफारस केली आहे. शिवाय, नगरनाका ते पडेगाव हा उड्डु-ाणपूल सहा लेनचा असावा, असेही नमूद केले.

>> जळगाव रोडवर ३ पूल

जळगाव रोडवर गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल करण्याची शिफारस पेडेकोने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT