छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत यावेळी पाच जिल्ह्यांतील दहावीचे १४ आणि बारावीचे ३२ परीक्षा केंद्र रद्द ठरविण्यात आले आहेत. मागील परीक्षेत गैरप्रकार झालेली सर्व परीक्षा केंद्र रद्द करण्यात येणार होते. मात्र, जवळ दुसरी पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे २१ केंद्रांना अभय मिळाले आहे.
राज्य मंडळाच्यावतीने फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी, बारावी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून परीक्षेच्यादृष्टीने मंडळस्तरावर पूर्वतयारीच्या कामाने वेग घेतला आहे.
गतवर्षी छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत इयत्ता दहावीचे ६४४ केंद्र होते. तर बारावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ४६० इतकी होती. त्यावेळी बोर्डाने कॉपीमुक्त परी क्षेचा संकल्प करीत दहावी, बारावी परीक्षेदरम्यान विविध केंद्रांवर कारवाया केल्या होत्या. ज्या केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार आढळतील त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार विभागात बारावीचे ४४ आणि दहावीचे १२ केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी बारावीचे २७ आणि दहावीचे ८ केंद्रच यावेळी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी जवळ दुसरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने ते केंद्र कायम ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा कमी संख्येने परीक्षार्थी असलेले केंद्रही बंद करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार दहावीचे २७ आणि बारावीचे ४९ केंद्र रद्द करण्याची शिफारस होती. त्यातीलही दहावीचे ६ आणि बारावीचे केवळ ५ केंद्र बंद करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्र कायम असणार आहेत.
त्या केंद्रांवर बाहेरचा स्टाफ
मागील परीक्षेत गैरप्रकार आढळूनही यावेळी जवळपास २१ केंद्र रद्द करण्यात आलेली नाहीत. त्या केंद्राच्या ठिकाणी जवळ दुसरी पर्यायी व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे केंद्र यंदाही सुरू राहणार आहेत. मात्र, यावेळी तिथे खबरदारी म्हणून बाहेरचा स्टाफ देण्यात येणार असल्याचे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले.